गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (08:37 IST)

कर्नाटकच्या निवडणुकांचा भारतीय राजकारणावर काय परिणाम होईल?

karnatak election
ANI
कर्नाटकच्या निवडणुकीतल्या पराभव किंवा विजयाचा भाजपपेक्षा काँग्रेस पक्षावर राष्ट्रीय पातळीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.
 
याचा अर्थ भाजपासाठी ही निवडणूक आव्हानात्मक नाही असा त्याचा अर्थ होत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
भारतातील आघाडीचे निवडणूक विश्लेषक संजय कुमार आणि योगेंद्र यादव यांच्या मते कर्नाटक निवडणुकीतील विजय हा काँग्रेससाठी मोठी संजीवनी असेल.
 
या विजयामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उर्जा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या राज्यातही वर्षाच्या शेवटी निवडणुका होणार आहेत.
 
उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतातल्या लोकांचा मत द्यायचा पॅटर्न वेगळा आहे.
 
कर्नाटकातल्या निवडणुकांचा त्यांच्या शेजारी राज्यात म्हणजे महाराष्ट्र किंवा तेलंगानामध्ये परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र राजकीय तज्ज्ञांच्या मते परिस्थिती फार वेगळी आहे.
 
CSDS संस्थेचे माजी संचालक संजय कुमार सांगतात, “समजा भाजपा ही निवडणूक हरली तर काँग्रेसमध्ये एक नवीन चैतन्य निर्माण होईल. त्यांना एक वेगळ्या प्रकारची उर्जा मिळेल. त्याचवेळी भाजपसाठी तो एक मोठा धक्का असेल. तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
 
"काँग्रेससाठी मात्र ती अंधारी वाट असेल. कारण 2024 च्या निवडणुकांसाठी अगदी शेवटच्या क्षणी ते कोणताच नॅरेटिव्ह सेट करू शकत नाहीत.” असं संजय कुमार म्हणाले.
 
काँग्रेसला लवकरात लवकर त्यांची भूमिका निश्चित करावी लागेल. कारण निवडणूक झाल्यानंतर ते असं करू शकत नाहीत. त्यामुळे काँग्रेससाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. असं ते पुढे म्हणाले.
 
कर्नाटकात 10 मेला निवडणुका होणार असून 13 मे ला निकाल लागणार आहेत. त्यावरून भाजपला ऑपरेशन कमळ पुन्हा राबवावं लागेल का हे तेव्हा स्पष्ट होईल.
 
भाजपने पहिल्यांदा हे अभियान 2008 मध्ये राबवलं होतं. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि जनता दलाचे आमदार आपल्याकडे वळवले होते. त्यांनीच या अभियानाला ऑपरेशन कमळ असं नाव दिलं आहे.
 
2008 च्या निवडणुकीत भाजपला 110 जागा आणि 2018 मध्ये 104 जागा मिळाल्या होत्या. जनता दलाच्या काही नेत्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि जनता दल- काँग्रेस ची युती तुटली आणि 2019 मध्ये भाजप काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सत्तेत आली.
 
योगेंद्र यादव यांच्या मते कर्नाटकातील निकाल अतिशय महत्त्वाचे आहेत. भाजपला कर्नाटकात कधीही बहुमत मिळालेलं नाही. यावेळेला त्यांना बहुमत मिळालं तर त्यांना ते मिरवण्याचं एक मोठं साधन मिळेल.
 
दक्षिण भारतात आम्ही मत मिळवले हे त्यांना सांगायला होईल आणि भारत जोडो यात्रेचा काहीही परिणाम झालेला नाही हे लोकांच्या मनात ठसवायला त्यांना सोपं होईल.
 
याचा विरोधी पक्षाच्या मनोधैर्यावर प्रचंड परिणाम होईल. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांनंतर असाच परिणाम झालेला बघायला मिळाला होता.
 
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निकालामुळे देशात सकारात्मक राजकारणाचा मार्ग मोकळा होईल. हिजाब आणि अझान सारख्या गोष्टींनी मतदार विचलित होत नाही आणि प्रशासन कसं चालतं यातच लोकांना रस आहे हे स्पष्ट होईल. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे असं ते पुढे म्हणाले.
 
भाजपसमोरची आव्हानं
कर्नाटक निवडणुकीत संजय कुमार भाजपला वर्गात सगळ्यात वरचा क्रमांक मिळवणाऱ्या मुलाची उपमा देतात. एखाद्या विषयात कमी पडलं तरी एकूण मार्क जास्त असल्यानो त्याचा क्रमांक वरचा असतो.
 
त्यामुळे या निवडणुकीत पराभव झाला तरी त्याचा भाजपवर फारसा फरक पडणार नाही असं त्यांना वाटतं. काँग्रेसवर मात्र त्याचा खूप परिणाम होईल असं त्यांना वाटतं.
 
ए. नारायणा अझीम प्रेमजी विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तेही संजय कुमार यांच्याशी सहमती दर्शवतात. काँग्रेसचा पराभव झाला तर त्यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल असं ते मानतात.
 
“जर भाजपचा पराभव झाला तर त्याचा अर्थ असा होतो की भाजपला दक्षिण भारतात प्रवेश करता आला नाही. जर भाजपचा विजय झाला तर शेजारील राज्यांत म्हणजे तेलंगाना, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू या राज्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येण्याची शक्यता आहे.” असं नारायण म्हणतात.
 
“दक्षिण भारतातलं दार अजूनही भाजपसाठी नीट उघडलेलं नाही. ते अजूनही तिथे धडका देत आहेत. कर्नाटक हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे.” असं ते पुढे म्हणाले.
 
कर्नाटकाच्या मतदारांची आणखी एक ओळख आहे जी लोकशाहीसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि वेगळी आहे. 1984 मध्ये लोकांनी ठरवलं की राजीव गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व करावं. 9 आठवड्यानंतर जानेवारी 1985 मध्ये याच मतदारांनी जनता दलाच्या रामकृष्ण हेडगेंच्या पारड्यात सत्ता दिली होती.
 
अशा पद्धतीने भाजप निवडणूक जिंकेल का या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना संजय कुमार म्हणतात, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित जिंकण्याची भाजपची क्षमता दोन तीन वर्षांपूर्वी जास्त होती. आता ती कमी झाली आहे. आता राज्य सरकारची प्रगती कशीही असली तरी दोन्ही निवडणुका एकत्र लढण्याची त्यांची क्षमता नाही. हा काळ 2015 ते 2019 होता. जर सरकारने चांगलं काम केलं नाही तर आता त्यांच्यासमोर आव्हानं असणारच.”
 
कर्नाटकात भाजपच्या 28 जागा आहेत. 1999 पासून भाजपला तिकडे दोन आकडी जागा मिळताहेत. हेगडे यांनी त्यांची लोकशक्ती पार्टी भाजपात विसर्जित केल्यावर त्यांची लिंगायत व्होट बँक भाजपात परिवर्तित झाली.
 
1999 मध्ये भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्ये त्यांना 25 जागा मिळाल्या. कर्नाटकला केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या जागा मिळाल्या.
 
त्यात अगदी परराष्ट्र मंत्री, रेल्वे, सामाजिक न्याय, कामगार, अन्न प्रक्रिया या मंत्रालयाचा समावेश होता. काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्षांना चांगलीच मंत्रिपदं मिळाली आहेत.
 
लोकशाहीवर मोठा परिणाम
या निकालांचा लोकशाहीवर मोठा परिणाम होणार असल्याचं यादव यांना वाटतं.
 
“मी अतिशय जबाबदारीने हा दावा करतोय की आपण एका विस्कळीत लोकशाहीत राहत आहोत. सगळ्यांना समान नागरिकत्वाची तरतूद आधीच नाकारली आहे. स्वातंत्र्याच्या हक्कावरही गदा आली आहे. घटनात्मक संस्थांची गळचेपी केली जात आहे. त्यामुळे सध्या हे आव्हान फक्त लोकशाहीचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण देशाचा आहे कारण भारताच्या राजकारणाचा पोतच विस्कळीत झाला आहे.” ते म्हणाले.
 
“त्यामुळे प्रजातंत्र परत आणणं जास्त महत्त्वाचं आहे. जर भाजपाचा पराभव झाला तर हे नक्कीच शक्य होईल. भारत जोडो यात्रेने एक गती मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या वर्चस्वाला एक प्रकारचा धक्का बसला आहे. हे आता पुढे कसं न्यायचं हे कर्नाटकचे मतदार ठरवतील.” ते म्हणाले.
Published By -Smita Joshi