मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना पीएफ व ग्रॅच्युइटी देणार: पंकजा मुंडे

मासिक वेतनासाठी सरपंचाचे पाय धराव्या लागणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन केले आहे. या कर्मचाऱ्यांना पीएफ आणि ग्रॅच्युइटीही मिळावी अशी माझी भूमिका आहे आणि हा निर्णय मी १०१ टक्के घेणार आहे, अशी घोषणा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी लातूर येथे केली. 
 
लातूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने लातूर, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्मचारी तसेच महिला बचतगट मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पंकजाताई बोलत होत्या. व्यासपीठावर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुनील गायकवाड, आ सुधाकर भालेराव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, रमेशअप्पा कराड, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे विलास कुमनवार, स्वाती जाधव, गुरुनाथ मगे, शैलेश गोजमगुंडे, प्रेरणा होनराव यांची उपस्थिती होती. 
 
मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला याबद्दल या मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला . 
पंकजाताई म्हणाल्या की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात होती ती थांबवली. आता वेतनश्रेणी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू. मी जिद्दीने मंत्री झालेली आहे. गरीबांच्या वेदना मला कमी करायच्या आहेत. म्हणूनच मी निर्णय घेते. मला सत्कार घेण्यास वेळ नाही. अभिमन्यू पवार यांच्या वशिल्यामुळे मी इथे सत्कार स्विकारला. सरकारने चांगली कामे केली आहेत. त्यामुळे कौरवाना राज्यावर बसवून पांडवाना वनवासाला पाठवू नका असेही त्या म्हणाल्या. 
 
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करावी अशा सूचना आपण किमान वेतन मंडळाला केल्या आहेत. यासंदर्भातील फाईल ज्या दिवशी माझ्याकडे येईल त्याच दिवशी त्याच्यावर स्वाक्षरी करून ती पुढे पाठवली जाईल. कामगार खात्याकडून ईपीएफ देण्याची शिफारस आपण करू असेही ते म्हणाले.