ऐतिहासिक शाळांच्या विकास योजनेत प्रतापसिंह हायस्कूल
मागील अनेक वर्षापासुन दुर्लक्षित असणाऱया व ऐतिहासिक असे महत्व असणाऱया सातारा शहरातील प्रतापसिंह हायस्कुलची दखल मंत्रालयाकडुन ही घेतली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असल्याने ज्या ज्या महापुरूषांनी देश उभारणीत बहुमोल योगदान दिले त्यांच्या जन्मगावच्या शाळांचा विकास करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे. याअंतर्गत राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात पहिल्या टप्यात राज्यातील 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हय़ातील तीन शाळांचा समावेश करण्यात आला असुन यामध्ये नायगावच्या (ता. खंडाळा) सावित्रीबाई फुले शाळा व कटगुण (ता. खटाव) येथील शाळेचा समावेश आहे.
सामाजिक सलोखा, लोकशाही अन मानवतावाद या मूलमंत्रा सोबतच देशाच्या स्वातंत्र्यात योगदान असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुषांच्या जन्मगावांचा या प्रस्तावात समावेश आहे. या महापुरुषांच्या जन्मगावच्या शाळा आधुनिक होतील. सुसज्ज इमारती असतील. या महापुरूषांचा इतिहास आणि विचार सांगणारे संग्रहालय असेल, असा या उपक्रमामागचा हेतू आहे. या सर्व शाळा ऐतिहासिक असल्याने भविष्यातील नव्या पिढीसमोर आपापल्या गावातील महापुरुषांचा आदर्श समोर उभा राहून राष्ट्राच्या उभारणीत योगदान देणारे प्रोत्साहन मिळावे यासाठी या शाळांचा विकास करण्यात येणार आहे. ही संकल्पना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची आहे. प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मान्यता दिली आहे.