शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (19:27 IST)

मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत निर्णय करण्याची आवश्यकता

पवारसाहेब व मुख्यमंत्री यांच्या भेटीत काय झालं मला माहीत नाही. मात्र सरकारच्या अस्थिरतेचा प्रश्नच येत नाही. हे विषय येतच असतात... चालूच असतात...समाजात नवे प्रश्न तयार होत असतात त्याचा आणि अस्थिरतेचा काय संबंध असे सांगत आघाडी सरकारवर उठलेल्या वावडयांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थांबा (फूलस्टॉप) दिला आहे. 
 
दरम्यान वावड्या उठवण्याचं काम आणि कारस्थान करतात त्यांना पत्रकारांनी पहिला प्रश्न विचारावा असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला. राज्यातील विविध घडामोडींविषयी प्रश्न विचारले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सडेतोड उत्तरे दिली.
 
चंद्रकातदादा यांचा रात्रीवरच जास्त भरोसा असतो असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांनी जनता झोपेत असेल तेव्हा सकाळी सरकार बदललेले असेल असे वक्तव्य केले होते त्या वक्तव्यावर प्रश्न केला आणि जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत वरील वक्तव्य केले. 
 
मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निर्णय करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व केंद्राच्या हातात आहे. यासाठी भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रात फिरण्याऐवजी दिल्लीत फिरले तर उपयोग होईल असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. 
 
लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित आली आहे. त्यामुळे चांगला फायदा प्रत्येक जिल्ह्यात झाला आहे. मी काही लॉकडाऊनच्या निर्णयावर थेट भाष्य करणार नाही मात्र याचा अर्थ असा नाही की, लॉकडाऊन कायम केला पाहिजे. लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न तयार झाला आहे. बर्‍याच ठिकाणी उपलब्ध सुविधा आता पुरायला लागल्या आहेत. एवढी रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र लॉकडाऊनबाबत निर्णय किंवा भाष्य करणं योग्य राहणार नाही. कोरोना स्थितीबाबत मंत्रीमंडळात दर आठवड्याला चर्चा होते आणि आवश्यक ते निर्णय घेतले जातात असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.