भंडारामध्ये दर शनिवार - रविवारला जनता कर्फ्यू
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने आता दर शनिवार - रविवारला जनता कर्फ्यूचे आयोजन करण्याचा निर्णयजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय सभेत घेण्यात आला. या जनता कर्फ्यूची सर्वत्र कडक अंमलबजावणी करण्याचेही ठरविण्यात आले असून पहिला जनता कर्फ्यू ३ व ४ आॅक्टोंबर रोजी जिल्ह्यात घोषित करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मात्र त्या तुलनेत नागरिक काळजी घेताना दिसत नाही. त्याचप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालनसुध्दा केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात कठोर उपाययोजना करण्यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत जनता कर्फ्यू हा कडक आणि जिल्हाभर लागू करण्यात यावा, असे मत सर्वांनी मांडले. या काळात वैद्यकीय सेवा सुविधा वगळता सर्व दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात यावे, अशी सूचना सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी केली. यात प्रामुख्याने पेट्रोलपंप, दारु दुकान, ढाबा आदींचा बंदमध्ये समावेश असावा असा सुरही बैठकीत उमटला. परंतु आरोग्य सेवासुविधा कुठेही थांबणार नाही व बाधित होणार नाही याची काटेकार काळजी घेण्यावर सर्वांचे एकमत झाले.