मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा
आज औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर विराट सभा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा औरंगाबाद येथे दाखल झाला आहे. औरंगाबाद येथे शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली आहे. मुख्यमंत्री यांच्या सभेसाठी जनसागर लोटला. ही सभा औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांची रेकॉर्डसभा होण्याचं शिवसैनिकांचा दावा आहे. या सभेत मुख्यमंत्री काय बोलतील याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
स्वाभिमान सभा
गेले अनेक दिवस या सभेची तयारी सुरू आहे. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. स्वाभिमान सभा असं या सभेला संबोधण्यात येत आहे. याच मैदानावर राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा झाली होती.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात शिवसेनेने बॅनर्स लावले आहेत. यावर हिंदुत्व आणि संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. सभेच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांसोबत संभाजी महाराजांचा पुतळाही ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेसाठी ही सभा आणि मैदान खास आहे. कारण मराठवाड्यात शिवसेनेची जी पहिली शाखा स्थापन झाली होती तिचा आज 37 वा वर्धापनदिन आहे. आणि याच मैदानातून 8 मे 1988 मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुक प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे आले होते आणि त्यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यात बॅनर युद्ध लागलेलं दिसून येत आहे. हिंदुत्वाचा हुंकार ऐकायलाच हवा, होय हे संभाजीनर, हिंदुत्वाचा गजर आपलं संभाजीनगर असे बॅनर्स शिवसेनेने लावले आहेत.
त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही बॅनर लावले आहेत. हा कसला स्वाभिमान? काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा की पाणी प्रश्नाचा असा भाजपने बॅनरच्या माध्याम्यून सवाल केला आहे. याशिवाय, "आजचा दिवस हा संभाजीनगर ' नामांतराच्या आश्वासनाचा वर्धापनदिन आहे का," असा सवाल भाजपने केला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मंगळवारी दक्षिण मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलात महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित होते.
राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
औरंगाबाद इथल्या सभेत मुख्यमंत्री संभाजीनगर नावाची घोषणा करणार का याविषयी उत्सुकता आहे. उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याबाबत मुख्यमंत्री काही बोलणार का यासंदर्भात चर्चा आहे.