शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (18:15 IST)

मुख्यमंत्री औरंगाबादचं 'संभाजीनगर' करण्याची घोषणा करणार?

uddhav
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद इथल्या सभेत काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या निमित्ताने वातावरण तापलं आहे.
 
गेले अनेक दिवस या सभेची तयारी सुरू आहे. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. स्वाभिमान सभा असं या सभेला संबोधण्यात येत आहे. याच मैदानावर राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा झाली होती.
 
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात शिवसेनेने बॅनर्स लावले आहेत. यावर हिंदुत्व आणि संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. सभेच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांसोबत संभाजी महाराजांचा पुतळाही ठेवण्यात आला आहे.
 
शिवसेनेसाठी ही सभा आणि मैदान खास आहे. कारण मराठवाड्यात शिवसेनेची जी पहिली शाखा स्थापन झाली होती तिचा आज 37 वा वर्धापनदिन आहे. आणि याच मैदानातून 8 मे 1988 मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुक प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे आले होते आणि त्यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती.
 
उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यात बॅनर युद्ध लागलेलं दिसून येत आहे. हिंदुत्वाचा हुंकार ऐकायलाच हवा, होय हे संभाजीनर, हिंदुत्वाचा गजर आपलं संभाजीनगर असे बॅनर्स शिवसेनेने लावले आहेत.
 
त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही बॅनर लावले आहेत. हा कसला स्वाभिमान? काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा की पाणी प्रश्नाचा असा भाजपने बॅनरच्या माध्याम्यून सवाल केला आहे. याशिवाय, "आजचा दिवस हा संभाजीनगर ' नामांतराच्या आश्वासनाचा वर्धापनदिन आहे का," असा सवाल भाजपने केला आहे.
 
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मंगळवारी दक्षिण मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलात महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित होते.
 
राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
 
औरंगाबाद इथल्या सभेत मुख्यमंत्री संभाजीनगर नावाची घोषणा करणार का याविषयी उत्सुकता आहे. उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याबाबत मुख्यमंत्री काही बोलणार का यासंदर्भात चर्चा आहे.
 
गेल्या महिन्यात मुंबईतल्या वांद्रेकुर्ला संकुलात झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडलं होतं.
 
मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
-मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मुंबईचे लचके तोडाल तर तुकडे तुकडे केले जातील. मुंबई तोडण्याचा डाव सुरू आहे. तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी मुंबई तुटणार नाही. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात जनसंघ होता. बुलेट ट्रेन कोणाला हवेय? मुंबई स्वतंत्र करू, असं खरंच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मनातलं ओठावर आलं. मुंबईचा लचका तोडण्याचा मनसुबा आहे. एकदाही संघ स्वातंत्र्यलढ्यात उतरला नव्हता. पुरावे असतील तर द्या".
 
-आता हे दाऊदच्या मागे लागले आहेत. उद्या दाऊद म्हणाला मी भाजपमध्ये येतो तर त्याला मंत्री बनवतील. म्हणूनच कदाचित त्याच्यासाठीच मागे लागले असतील. मग तो भाजपमध्ये आल्यावर सांगतील तो कसा गुणांचा पुतळा आहे
 
-हिंदुत्वाचा भेसूर आणि बेसूर चेहरा समोर येतो आहे. भीषण पद्धतीने अंगावर येत आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत हे शिकवलं जातं का? कधी चिंतन कधी कुंथत बसतात. खोटंनाटं बोललं जातं. आपण खोटं बोलू शकत नाही. खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदुत्वात बसतं, आपल्या हिंदुत्वात बसत नाही.
 
-संभाजीनगर आहेच, नामांतराची गरजच काय. कोणाला हनुमान चालिसा द्यायची, कोणाला भोंगा द्यायचा, कोणाला औरंगजेबाच्या कबरीवर पाठवायचं. हे काय करणार- टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही
 
-ज्यांना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. कधी शाल घालून फिरतात. कधी हिंदुत्वाच्या मागे लागतात. चित्रपटातला मुन्नाभाई लोकांचं भलं करत होता. यांचं काय. राज ठाकरेंच्या डोक्यात मुन्नाभाईप्रमाणे केमिकल लोचा
 
-मंदिर टिकेल कसं हा विचार केला नाही. मोडता घातला आहे. अशी खाती आहेत ज्यांना तत्व नाही त्यांना पुरा तर पुरातत्व खाती होतील. मंदिराचा एफएसआय वाढवणार नाहीयोत. मंदिर दीर्घकाळ टिकेल यासाठी जीर्णोध्दार करत आहोत. थडग्याची देखभाल करत आहेत पण मंदिरांची देखभाल नाही
 
-आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आहे. उज्वला योजनेचे बारा वाजले आहेत. फुकट धान्य दिलं, खायचं कसं. शिजवायची सोय काय? हनुमानाचा अपमान करू नका. हनुमानाचं स्तोत्र पाठ आहे. लहानपणी आजोबा म्हणून घ्यायचे. अर्जुनाचं स्तोत्र पाठ आहे. राम, हनुमान हदृयात असायला हवेत.