1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (08:26 IST)

संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिली आहे. तर, अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, इतर 5 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, 1 डिसेंबरपर्यंत शुल्क जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन यांच्या आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गातील 87 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील गृहपाल, गट-ब संवर्गातील एका पदावरील भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर, 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
 
मुख्य प्रशासकीय अधिकारी पदाच्या 4 जागांसाठी जाहिरात
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार व अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी संवर्गातील 4 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.