शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 मे 2023 (08:28 IST)

महाराष्ट्र, दक्षिणेकडे पाऊस कमी होणार

mansoon
विदर्भ ते उत्तर केरळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र असून, हे क्षेत्र मराठवाडा, कर्नाटकच्या भागावरून जात आहे. तसेच अरबी समुद्राकडून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने याच्या प्रभावामुळे कोकण-गोवा, दक्षिण महाराष्ट्र, बेळगावसह अनेक भागांत मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या क्षेत्राचा परिणाम आणखी दोन दिवस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान याच्या प्रभावामुळे कोकण-गोव्यात पुढील चार दिवस, तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यातही पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
 
वरील सर्व क्षेत्रांच्या प्रभावामुळे देशभरातील काही भागांत नोंदविण्यात आलेली उष्णतेची लाट तसेच कमाल तापमानात घट होणार असून, वायव्य, मध्य, पश्चिम व पूर्व भारतातील कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मंगळवारी दिल्ली, उत्तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंडच्या काही भागात उष्णतेची लाट नोंदविण्यात आली.
 
कर्नाटकात ‘यलो अलर्ट’
कर्नाटकात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक तसेच कर्नाटक किनारपट्टीवर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
मान्सूनसाठी पोषक स्थिती
मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला असून, पुढील दोन दिवसांत तो दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटे व्यापण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor