बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (08:06 IST)

राज ठाकरे यांनीही मनसैनिकांकडून निष्ठेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात

raj thackeray
४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला मोठीच गळती लागली आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकमागून एक बैठका, सभा, दौरे यावर भर देत पक्ष वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे शिवसेनेने खासदार, आमदार, नगरसेवकांपासून पंचायत समिती सदस्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाकडूनही तशाच प्रकारचे पत्र घेतले जात आहे. मात्र, अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मनसैनिकांकडून निष्ठेचे प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
 
शिवसेनेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून देण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपुरात मनसैनिकांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचे शपथपत्र भरून दिले आहे. अशा प्रकारचे शपथपत्र भरून देणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार शपथपत्र भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor