ठोस भूमिका घेणारे साहित्यिक गेले कुठे?
महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या जडणघडणीत प्रत्येक टप्प्यावर साहित्यिक ठाम भूमिका घेताना दिसत होते. मात्र, हल्लीचे साहित्यिक राज्यात घडत असलेल्या घटनांविषयी भूमिकाच घेताना दिसत नाहीत. आज गप्प बसलात तर भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील साहित्यिकांना कानपिचक्या दिल्या. ते रविवारी सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या औदुंबर साहित्य सन्मेलनाच्या व्यासपीठावर बोलत होते.
यावेळी राज यांनी संयु्रत महाराष्ट्राचा लढा, आणीबाणीचा काळ आणि केरळमधील साहित्य चळवळीचा दाखला देत राज्यातील साहित्यविश्वाला फटकारले. समाजाची मशागत करणे हे साहित्यिकांचे काम आहे. लोकांना वर्तानातील घडामोडी समजावून सांगणे ही तुमची जबाबदारी आहे. ती तुम्ही पार पाडताना दिसत नाही. त्यामुळे आतातरी महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीविषयी बोला, त्याबद्दल लिहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हा समृद्ध वारसा पाहून अनेक लोक याठिकाणी येतात. मात्र, आजच्या घडीला महाराष्ट्रात ज्याप्रकारची षड्यंत्र रचली जात आहेत किंवा अतिक्रमणसुरु आहे, त्याविरोधात राज्यातील लेखक, कवी या सर्वांनीच ठाम भूमिका घेतली पाहिजे. ही शहरे तुमची आहेत, याची जाणीव ठेवून सगळ्या राजकीय आणि जातीय भिंती पाडून टाका. महाराष्ट्रावर येणार्या संकटांचा प्रतिकार करा, असेही ठाकरे यांनी सांगितले.
यापूर्वीच्या साहित्यिकांच्या लिखाणातून आपल्याला महाराष्ट्रातील परिस्थितीची जाण येईल. मात्र, आपण त्यांचे साहित्या वाचणारच नसू तर केवळ एका दिवसाचे साहित्य संमेलन भरवून काहीच उपयोग नाही. आपल्याला इतिहासातील चुकांमधून बोधच घ्यायचा नसेल, तर अशा साहित्य संमेलनांचा फायदाच काय? त्यामुळे आपण साहित्य वाचून कितपत बोध घेतो, हे महत्त्वाचे आहे. आज ज्या वेगाने घडामोडी सुरू आहेत त्या पाहता राज्यातील प्रमुख शहरे आपल्या हातातून गेली तर महाराष्ट्राला काही किंमत उरणार नाही, असे सांगत राज यांनी शहरांतील परप्रांतियांच्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
याशिवाय, त्यांनी सध्या केरळमध्ये सुरू असलेल्या साहित्य चळवळीचे उदाहरण दिले. केवळ साहित्य संमेलनं भरवण्यापेक्षा आपल्या भाषेतील साहित्य जगापर्यंत पोहोचवा.
दक्षिणेकडील राज्यात सरकार अशा साहित्य चळवळींच्या ठामपणे पाठिशी उभे राहते. तेथील साहित्यिकदेखील राज्यातील परिस्थितीवर परखडपणे भाष्य करतात. मात्र, आपल्याकडे सध्या तसे होताना दिसत नाही. यापूर्वी विजय तेंडुलकर, पु.ल. देशपांडे यांनी आपापल्या काळात ठामपणे भूमिका घेतल्या होत्या. यापैकी काही भूमिका या अतिरेकीही असतील पण त्यांनी भूमिका घेतली, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे साहित्यिकांनी राजकारणाचा विचार न करता महाराष्ट्रातील परिस्थितीविषयी परखडपणे बोलले पाहिजे. निवडणुका असतील तेव्हा आपण भले एकमेकांच्या उरावर बसू, पण त्या संपल्यानंतर एकदिलाने मराठी हितासाठी काम करू, हे आपण अंगिकारले पाहिजे. त्यामुळे किमान आतातरी सरकार कोणाचे आहे, याचा विचार न करता आपली भूमिका मांडा, असे राज यांनी साहित्यिकांना सांगितले.