शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 मार्च 2024 (13:51 IST)

रामदास आठवलेंचे मोठे विधान! म्हणाले, "राज ठाकरेंना 'एनडीए'मध्ये घेण्याची गरज नाही

ramdas adthavale
लोकसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत येण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. यातच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते तथा खासदार रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. मनसे नेते राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची कोणतीही आवश्यकता नसून त्यांना घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असे स्पष्ट मत आठवले यांनी व्यक्त केले.
 
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले ?
रामदास आठवले यांनी म्हटलं की, “राज ठाकरे हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. पण राज ठाकरे युतीसाठी भेटलेले असावेत वाटत नाही. राज ठाकरे आल्याने फार फायदा होईल, असं मला वाटत नाही. त्यांना सोबत घेण्याची गरज नाही, अशी आमची भूमिका आहे. परंतु राज ठाकरेंबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल,” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
 
राहूल गांधींना देखील एनडीएमध्ये यावं लागेलं
सध्या सगळेच एनडीएमध्ये येऊ लागले आहे. काँग्रेसचे लोक देखील एनडीएमध्ये येत आहेत. सध्या काँग्रेसमधून एवढे लोक बाहेर पडत आहेत की शेवटी सोनिया गांधी आणि राहुल गांधीच तेथे राहतील अशी स्थिती आहे. एक दिवस राहूल गांधींना देखील इकडे यावं लागेल”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं.
 
राज्यातील राजकीय पक्षांच्या परिस्थितीबाबत भाष्य करताना त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीला त्या पक्षांचे प्रमुख नेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आधीच सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांना गटबाजी करण्यापासून रोखायला हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत आरपीआय पक्षाला किमान दोन जागा मिळण्याबाबतची मागणी आठवले यांनी केली आहे. त्यांनी या निवडणुकीत आपले 2 तरी खासदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor