रत्नागिरी : शिवभोजनाच्या 10 रुपयांच्या थाळीत चिकन
चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, हे सांगण्यासाठी रत्नागिरीत एक अनोखी शक्कल लढवण्यात आली. सध्या नगरिकांमध्ये शिवभोजन थाळी प्रसिद्ध आहे. याचाच फायदा घेत रत्नागिरीतील एसटी स्टॅण्ड जवळच्या शिवभोजन केंद्रावर शिवभोजन थाळीत चिकन वाढण्यात आलं. विषेश म्हणजे ही चिकन थाळी शिवभोजन थाळीच्याच किंमतीत म्हणजे दहा रुपयांत देण्यात आली.
सध्या कोरोना विषाणू जगभरात धुमाकूळ आहे. हा विषाणू जीवघेणा आहे खरा. मात्र, त्याहून धोकादायक कोरोना विषाणूसंदर्भातील पसरणाऱ्या अफवा आहेत. अशीच एक अफवा म्हणजे, चिकन खाल्ल्याने कोरोना होतो. या अफवेमुळे चिकन व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. चिकन व्यवसायिक आणि पोल्ट्री फार्म धारकांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे.
या अफवेमुळे चिकनचे दर 200 रुपयांवरुन 50-70 रुपये प्रति किलोपर्यंत घसरले. तर 5-6 रुपयांना मिळणारी अंडी 2-3 रुपयांवर आली.
व्यावसायिकांवर हे संकट दूर करण्यासाठी आणि चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, याबाबत जनजागृती करण्यासाठी रत्नागिरीतील या शिवभोजन थाळी केंद्रावर हा उपक्रम राबवण्यात आला.
शिवभोजन थाळीतून फक्त आजच्या दिवसासाठी चिकन करी आणि चिकन मसाला असे पदार्थ देण्यात आले. शिवभोजन थाळीच्या दहा रुपये दरातच चिकनचे पदार्थ दिल्याने, याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.