सोमवार, 5 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 13 मार्च 2021 (16:04 IST)

रेखा जरे हत्याकांड, मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटक

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे. अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली. 
 
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला नगर पुणे मार्गावरील पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जातेगाव घाटामध्ये मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केली होती. पोलिसांनी तातडीने तपास करत याप्रकरणी पाच जणांना अटक केल्यानंतर जरे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या हत्येमागील मुख्य सूत्रधार नगर मधील प्रतिष्ठित पत्रकार आणि एका प्रमुख दैनिकाचा कार्यकारी संपादक असलेला बाळ बोठे असल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. हत्याप्रकरणात बोठे याचे नाव समोर येताच तो पसार झाला होता. जवळपास साडे तीन महिन्यापासून फरार असलेल्या पत्रकार बोठे याला पकडण्यात नगर पोलिसांना यश आले आहे.
 
दरम्यान, न्यायालयाने बोठे याला फरार घोषित करत नऊ एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेशदेखील दिले होते. दरम्यान बोठे याला मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावे पोलिस तपासात समोर आली असून यात एका महिलेचा देखील समावेश असल्याचे समजते. बोठेला घर भाड्याने मिळवून देणे, मोबाईल फोन उपलब्ध करून देणे, पैसे पुरविणे अशा प्रकारची मदत या संशयितांनी केल्याची माहिती उपलब्ध होत आहे. त्यामुळे जरे यांच्या हत्या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे आणि नेमकी हत्या कोणत्या कारणासाठी केली याचा उलगडा करण्यात आता नगर पोलिसांना यश मिळणार आहे.