छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवा, अन्यथा महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर सातत्याने राज्याची अवहेलना होत आहे. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलं आहे. महाराष्ट्रात जणू काही माणसं राहतच नाहीत.
"महाराष्ट्राला अस्मिता, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाही. कुणीही यावं आणि टपली मारून जावं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून नुसतंच गप्प बसायचं, हे आता खूप झालं," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आले. एका कार्यक्रमात सहभागी होऊन ते बाहेर पडत असताना माध्यमांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया मागितली.
यावेळी फडणवीस म्हणाले, "मी कार्यक्रमात व्यासपीठावर होतो, त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, हे मी ऐकलेलं नाही. पण शरद पवार आज बोलले आहेत, ते बोलल्यानंतरच उद्धव ठाकरे बोलतात, एवढं मी सांगू शकतो."
पण सीमावादाबाबत बोलताना ते म्हणाले, "राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून सीमेचा वाद सुरू आहे. पक्षाचा वाद असण्याचं कारण नाही.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर केलेला दावा हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीनुसारच केलेला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्रात मिंधे सरकार असल्यामुळे त्यांना स्वतःला ते मुख्यमंत्री आहेत किंवा नाही, हे कळत नाही. त्यांच्याकडून आम्हाला काहीही अपेक्षा नाही.
उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकतात का, असा सवाल ठाकरे यांनी केला.
एकूणच गेले काही दिवसांत, विशेषतः महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर सातत्याने अवहेलना होत आहे.
आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलं आहे. महाराष्ट्रात जणू काही माणसं राहतच नाहीत. महाराष्ट्राला अस्मिता, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाही. कुणीही यावं आणि टपली मारून जावं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून नुसतंच गप्प बसायचं, हे आता खूप झालं.
महाराजांचा अपमान झाल्यानंतर मुळमुळीत गुळगुळीत प्रतिक्रिया दिल्या जातात. ज्यांनी अपमान केला, त्यांच्याच पक्षातील लोक अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत.
गेले काही दिवस आपण पाहत आहोत, देशात काही विषयांची चर्चा व्हायला पाहिजे. ती होतही आहे.
देशाच्या कायदेमंत्र्यांनी न्यायमूर्तींच्या नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ही पद्धत अपारदर्शक असून पंतप्रधानांमार्फत ही नियुक्ती व्हावी, असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच निवडणूक आयुक्तांसंदर्भातही कुणीतरी याचिका दाखल केली आहे.
ते पुढे म्हणाले, "स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली. देशात ज्यांचं सरकार असतं, त्यांचीच माणसं राज्यात राज्यपाल म्हणून पाठवली जातात. ज्यांना वृद्धाश्रमात जागा नाही, त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का हा प्रश्न आहे.
राज्यपालपदी नेमण्याचे निकषही ठरवायला पाहिजेत. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपतींप्रमाणे राज्यपालसुद्धा निःपक्ष असायला पाहिजेत. राज्यात काही अडचणी असतील तर ते सोडवण्याची त्यांची तयारी पाहिजे.
कोश्यारी यांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. महाराष्ट्रातील जुने आदर्श मोडून त्यांच्या मंडळींची आदर्श स्वीकारावेत, असं कोश्यारींचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील मराठी लोकांचा अपमान केला होता. सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही ते असंच बोलले होते. यांच्या सडक्या मेंदूमागे कोण आहेत, हे शोधलं पाहिजे.
त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांना दोन दिवसांत न हटवल्यास महाराष्ट्र बंदचं आंदोलन पुकारू, असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्रात मिंधे सरकार असल्यामुळे त्यांना स्वतःला ते मुख्यमंत्री आहेत किंवा नाही, हे कळत नाही. त्यांच्याकडून आम्हाला काहीही अपेक्षा नाही.
उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारवासारव करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री त्यांच्या वरीष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकतात का, असा सवाल ठाकरे यांनी केला.
Published By- Priya Dixit