शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (08:29 IST)

रोहित पवारांच्या खांद्यावर ‘त्या’ पाच मतदारसंघाची जबाबदारी !

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांचे नाव नेहमीच चर्चेत असते, मागील विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक कामाच्या जोरावर रोहित पवार यांनी एका दणक्यात भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ सोडून घेतला आणि कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार झाले.

त्यांच्या या दमदार कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी लवकरच घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर पक्षाने आता राज्यातील ५ महत्वाच्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे. या मतदारसंघांत पक्षसंघटन वाढवण्याचं काम पक्षाने आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपवलं आहे.
 
आमदार रोहित पवार म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी जी जबाबदारी दिली आहे ती पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. माझ्या प्रयत्नामध्ये त्या त्या मतदारसंघातील तरुणांचे विशेष सहकार्य मला लाभणार आहे.
 
ते मतदारसंघ कोणते
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते आमदार आहेत. त्यांचे वर्चस्व मोडीत काढून तिथे आमदार रोहित पवार यांना पक्ष संघटनेवर लक्ष्य दयावे लागणार आहे. मागच्या वेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा निसटता पराभव झाला होता. उस्मानाबाद आणि भूम-परांडा, येथे शिवसेनेचे आमदार आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची मोठी पिछेहाट झालेली आहे. पवारांचे निकवर्तीय माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या परिवाराने राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने पवार कुटुंबीयांना जिव्हारी लागले होते. तेथे राष्ट्रवादीला कामाची पावती घेऊन लोकांपर्यंत पोहचावे लागणार आहे.
 
करमाळा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पवार यांच्यावर सोपवली. करमाळ्यात संजय शिंदे हे अपक्ष आमदार आहेत. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे भारत भालके विजयी झाले होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने ही जागा राष्ट्रवादीकडून खेचून घेतली. भाजपचे समाधान आवताडे तेथून विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीला हा पराभव जिव्हारी लागलेला आहे.
 
पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार  आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांनी आपल्यावर ही जबाबदारी सोपवली असून पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पक्षाचे प्रत्येक काम जनतेपर्यंत घेऊन जाणार आणि लोकांच्या मनामध्ये पक्ष्याबद्दल विश्वास संपादन करणार. आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास रोहित पवार यांनी ट्वीट करून व्यक्त केला आहे.
 
रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड   मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून हिसकावला आहे. त्यानंतर तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अन्य माध्यमातून रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचा जम बसवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात पक्षाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
 
अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने विविध कारणांमुळे महत्त्वाच्या असलेल्या मतदारसंघांची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर सोपवली आहे. आमदार झाल्यापासून पवार यांनी मुंबईतील मंत्रालयात जम बसवणे आणि राज्यभरात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या संपर्काचा आणि कामाच्या धडाक्याचा पक्षाने पुढील निवडणुकीत फायदा करून घेण्याचं ठरवल्याचं दिसत आहे. त्यामुळे हळूहळू रोहित पवार यांच्याकडे मोठमोठ्या जबाबदाऱ्या येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.