1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 मार्च 2024 (09:21 IST)

सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची 45 लाख रुपयांची फसवणूक

Retired Bank Officer Cheated of Rs 45 Lakhs
मुंबई पोलीस सीबीआयमधून बोलत असल्याची बतावणी करून मनी लॉन्डरिंंग केसमध्ये अटक करण्याचा धाक दाखवून एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची 45 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दिगंबर शंकर शालिग्राम (वय 61, रा. गायत्री सोसायटी, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक) हे सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. ते दि. 7 मार्च रोजी घरी होते. त्यावेळी 9621175843 व फोन क्रमांक 2224050084 या क्रमांकांवरून अज्ञात इसमांनी फिर्यादी शालिग्राम यांना फोन केला.
फोनवरून बोलणाऱ्या व व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी मुंबई पोलिसांच्या सीबीआयमधून बोलत असल्याची बतावणी शालिग्राम यांना केली, तसेच मनी लॉन्डरिंग प्रकरणात केस दाखल असून, त्यात त्यांचा सहभाग असल्याचा बहाणा त्यांना चॅटिंग करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याकडे केला.
 
त्यानंतर मनी लॉन्डरिंगच्या केसमध्ये अटक करण्याचा धाक दाखवून फिर्यादी शालिग्राम यांना स्मॉल फायनान्स बँक, पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी शालिग्राम यांनी दि. 7 ते 13 मार्च यादरम्यान आरोपींनी सांगितलेल्या नमूद बँकेच्या खात्यांमध्ये 45 लाख 10 हजार रुपये ट्रान्स्फर केले. त्यानंतर आरोपींनी शालिग्राम यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor