शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (07:55 IST)

सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते

sachin waze
संघटना वाचवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे झटताना दिसत आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच शिंदे गटातील एका खासदाराने केलेल्या गौप्यस्फोटावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.
 
जसजसा दसरा जवळ येत आहे, तसे दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. आता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांच्याकडून मातोश्रीवर दर महिन्याला १०० खोके जात होते, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. प्रतापराव जाधव यांनी केलेल्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत शिंदे गटातील आमदारांना ‘५० खोके एकदम ओके’, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात येत होता. मात्र, आता शिंदे गटात गेलेल्या खासदारांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच “शंभर खोके एकदम ओके”, या शब्दांत पलटवार केला आहे.
 
शंभर खोके एकदम ओके
 
अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे हे आता जेलमध्ये आहेत. हे लोक महिन्याला वसुली करत होते. सचिन वाझे हे दर महिन्याला १०० खोके मातोश्रीवर पाठवत होते, असा मोठा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor