शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (20:36 IST)

आदेश बांदेकरांच्या जागी सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेनेच्या सदा सरवणकर यांची नियुक्ती

Sada Saravankar
सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष होते. आता या पदी शिंदे गटाच्या सरवणकरांची वर्णी लागली आहे. दरम्यान, गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार गेल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती.
 
शिवसेनेचे (शिंदे गट) माहिम दादर विधानसभेचे आमदार यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती. त्यासाठी गेल्या गणेशोत्सवात शिवसेनेच्या दोन गटांतील राडा कारणीभूत ठरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पण आता सरवणकरांना सिद्धिविनायक पावला असून सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सरवणकरांकडे मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचं बोलंल जात होतं. अनेक दिवसांपासून तर्कवितर्कही लावले जात होते. अशातच आज सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी नेमणूक झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 
शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. माहिम, दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचं काम सदा सरवणकरांनी केलं आहे. शिवसेनेत असताना सरवणकरांनी विभागप्रमुख, स्थायी समिती अध्यक्ष अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. तसेच, सरवणकर सर्वात आधी नगरसेवक म्हणून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर सरवणकरांनी शिवसेनेकडूनच आमदारकीची निवडणूक लढवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंची कास धरली. ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक असणारे आमदार सदा सरवणकर शिंदे गटात सामील झाले.
 
सदा सरवणकरांची कारकिर्द
सदा सरवणकर 1992 ते 2007 पर्यंत नगरसेवक होते. त्यानंतर 2004 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये मात्र सदा सरवणकरांनी तिकीट नाकारत पक्षाकडून आदेश बांदेकरांना तिकीट देण्यात आलं. त्यावेळी नाराज सदा सरवणकरांनी शिवसेनेची साथ सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत 2009 ची निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली. त्यानंतर 2012 मध्ये सरवणकरांनी काँग्रेसमधून पुन्हा घरवापसी केली. त्यावेळी माहिम दादर विधानसभेत शिवसेनेची पकड फारशी मजबूत राहिलेली नव्हती. त्यावेळी पक्षाकडून सदा सरवणकरांवर पक्षबांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली. सरवणकरांवर विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर सर्वात आधी 2014 मध्ये आणि त्यानंतर 2019 मध्ये सदा सरवणकर सलग दोन टर्म आमदार म्हणून निवडून आले.
 



Edited By - Ratnadeep Ranshoor