शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जून 2022 (16:02 IST)

विधान परिषद निवडणूक: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे

राज्यसभेच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडींनंतर झालेल्या भाजपच्या विजयाने विधान परिषदेसाठी समीकरण तापलं आहे. विधान परिषद बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.
 
विधान परिषदेसाठी 20 जून रोजी होणार मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार आहेत.
 
भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड रिंगणात आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी निवडणुकीला उभे आहेत. राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात आहेत.
 
"आमची अपेक्षा अशी होती की सत्तारुढ पक्षाने निवडणूक बिनविरोध करावी. पण ती बिनविरोध होऊ शकली नाही. आम्ही 5 जागा लढवतोय. सत्तारुढ पक्षात खूप असंतोष आहे. या असंतोषाला जागा हवेय म्हणून आम्ही पाचवी जागा लढवतोय. निवडणूक सोपी नाही, पण आम्ही पाचवी जागा निवडून आणू", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
"सत्ताधारी पक्षाने माझ्याशी चर्चा केली. काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा अशी चर्चा होती पण तसं झालेलं नाही. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे. महाविकास आघाडीत असंतोष आहेच".
 
"जोकरसारखे स्टेटमेंट रोजच करत असतात. आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. सहा जागा लढवायच्या की पाच यावर चर्चा झाली. अध्यक्ष चंदक्रांतदादा पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पाच जागांवर लढणार आहोत", असं फडणवीस म्हणाले.

भाजपकडे सध्या 106 जागांचं संख्याबळ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मते आवश्यक आहेत.
 
या गणितानुसार, भाजपचे पहिले 4 उमेदवार सहज निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी काही मतांची तजवीज करावी लागेल. चार जागांसाठी 108 मतांची गरज लागेल. त्यामुळे प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी आणखी 27 मतांची जुळवाजुळव भाजपला करावी लागणार आहे. पाचवी जागा जिंकण्यासाठी भाजपला 130 पेक्षा जास्त मतांची गरज लागेल. यामुळे भाजपला बरीच मेहनत करावी लागणार आहे. हे लक्षात घेऊन भाजपने सदाभाऊ खोत यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं.
 
सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर 9 जून रोजी अर्ज दाखल केला होता. फडणवीसांच्या सांगण्यानुसार अर्ज भरलाय. त्यांनी सांगितलं तर पुन्हा माघारही घेऊ, असंही त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.