संबंधित माहिती
- Legislative Council Election 2026: महायुतीमधील जागावाटप निश्चित झाले
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: पुणे जागेवर शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील हे उमेदवार
- विदर्भात 'ऑपरेशन लोटस' योजनेची चर्चा, विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे ६० नगरसेवक नॉट रिचेबल
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: जागावाटपावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान
विधान परिषद निवडणूक २०२६: परभणी-हिंगोलीत एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र; अल्पसंख्याक चेहऱ्याला दिली उमेदवारी!
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय वर्तुळातील सर्व अंदाज बाजूला सारत पुन्हा एकदा आपले 'धक्कातंत्र' वापरले आहे. महायुतीकडून या जागेसाठी शिवसेनेचे (शिंदे गट) अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि तरुण चेहरा सईद खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कोअर टीमचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जाणाऱ्या सईद खान यांच्या उमेदवारीमुळे मराठवाड्याच्या राजकीय समीकरणांना आता एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अल्पसंख्याक समाजाला साद आणि राजकीय खेळी
शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांसोबतच मराठवाड्यातील अल्पसंख्याक समाजाला महायुतीकडे खेचण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी टाकलेला हा पत्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे परभणी-हिंगोलीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होणार असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील लढत आता रंजक आणि चुरशीची होणार आहे. अल्पसंख्याक समाजात या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होताना दिसत आहे.
कोण आहेत सईद खान?
निष्ठवान समर्थक: सईद खान हे गेल्या १५ वर्षांपासून एकनाथ शिंदे यांचे खंदे आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
पक्षातील मोठी जबाबदारी: ९ जुलै २०२३ रोजी त्यांच्याकडे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवले.
मोठी पक्षबांधणी: त्यांच्या कार्यकाळात राज्यातील विविध नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील सुमारे ९०० अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
२०२४ ची निवडणूक: २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत तब्बल ५५,००० मते मिळवून आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती.
'पाथरी पॅटर्न' आणि विकासाचा आलेख
सईद खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी तब्बल ५,६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये मुख्यत्वे शिष्यवृत्ती आणि अल्पसंख्याक विकास महामंडळाच्या निधीचा समावेश आहे. याशिवाय केवळ पाथरी विधानसभा मतदारसंघात त्यांनी ९५० कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यांच्या या स्थानिक प्रभावामुळेच पक्षाला मोठा फायदा झाला आहे:
नगरपरिषद निवडणुका (२०२५): पाथरी नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आणत नगराध्यक्ष व ९ नगरसेवक निवडून आणले. सोनपेठमध्ये आघाडी करून नगराध्यक्ष आणि १० नगरसेवक, तर मानवतमध्ये ५ नगरसेवक निवडून आणण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.
स्थानिक निवडणुका (२०२६): नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पाथरी मतदारसंघातून २ जिल्हा परिषद सदस्य आणि ४ पंचायत समिती सदस्य निवडून आणले. तसेच पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) शिवसेनेचे ९ संचालक निवडून आणून त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
सईद खान यांच्या याच संघटनकौशल्याची आणि कामगिरीची दखल घेत पक्षाने त्यांना थेट विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष परभणी-हिंगोली मतदारसंघाकडे लागले आहे.
