बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (21:23 IST)

समीर वाणखेडे यांची पत्नी क्रांति रेडकरचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाली, आज बाळासाहेब असते तर...

मुंबई: आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणी चौकशी करणारे एनसीबीचे  झोलल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या सातत्याने आरोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्याबाबत एकापाठोपाठ गौप्यस्फोट करत आहे. अशातच समीर वानखेडे यांची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र लिहिलं आहे. योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी देखील क्रांती रेडकर हिनं केली आहे.
 
क्रांती रेडकर हिनं सांगितलं की, तिला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे. या त्यासाठी तिनं शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. पण, अद्याप तिला मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिलेली नाही. 
क्रांती रेडकर हिनं लिहिलं… बाळासाहेब असते तर…
क्रांती रेडकरने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, ‘मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये, हे या दोघांनी शिकवले. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.लढते आहे.
सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत. मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही. आमचा काहीही संबंध नाही. मला त्यात पडायचे नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमची बदनामी करण्यात येत आहे. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीचा टीका करुन खेळ करण्यात येत आहे. माझ्यावर होणारे खासगी हल्ले बाळासाहेब ठाकरे यांनी खपवून घेतले नसते. मला खात्री आहे. मला न्याय मिळेल. माझ्यावर तुम्ही अन्याय होऊ देणार नाहीत. तुमच्याकडून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. तुम्ही योग्य न्याय करा.’