Sangali: उमदीत आश्रम शाळेतील 170 मुलांना जेवणातून विषबाधा
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील 170 विद्यार्थ्यांना रविवारी रात्री विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या मधील सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून काही विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उमदी येथे समता आश्रम शाळेत सुमारे 200 हुन अधिक विद्यार्थी शिकतात. उमदीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते.या मध्ये 5 ते 15 वर्षांच्या मुलांचा समावेश आहे. दररोज प्रमाणे रात्री आश्रम शाळेकडून मुलांना जेवण देण्यात आले. एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि बासुंदी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.रात्री जेवल्यानंतर मुलांना उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाला. एकाच वेळी 170 मुलांना त्रास सुरु झाल्यामुळे आश्रम शाळा प्रशासनाने तातडीनं मुलांना रात्रीच माडग्याळ प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. मात्र या ठिकाणी आरोग्य यंत्रणा अपूर्ण असल्यामुळे मुलांना जतच्या ग्रामीण प्राथमिक रुग्णालयात रेफर केले.
या मुलांपैकी 50 हुन अधिक मुलांची प्रकृती खालावली त्यांना मिरज आणि सांगलीच्या रुग्णालयात दाखल केले. जेवण्यात बासुंदी खाल्ल्यामुळे मुलांना त्यातून विषबाधा झाल्याची शक्यता वर्तव्यात आली आहे. या घटनेमुळे आश्रम शाळेत खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत येत्या 24 तासात विषबाधा कोणत्या कारणामुळे झाली याचा अहवाल देण्याच्या सूचना समाज कल्याण विभागाला दिले आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
Edited by - Priya Dixit