रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (10:25 IST)

विदर्भातील विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी तीव्र लढा उभारणार- संग्राम कोते पाटील

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रदेशाध्यक्ष संग्राम कोटे पाटील यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष निखिल ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वैद्य, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शुभम होले, शहराध्यक्ष आकाश हिवसे आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. 

दरम्यान मोर्चानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याबाबत बोलताना संग्राम कोते पाटील म्हणाले की, नियमानुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत परीक्षांचा निकाल लागायला हवा. मात्र संत गाडगेबाबा विद्यापीठात निकाल लवकर लावला जात नाही. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची फेरतपासणीही योग्य पद्धतीने होत नाही. अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रलंबित आहेत. एकूणच विद्यापीठाचा कारभार अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे अशी खंत संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी संत गाडगेबाबा विद्यापीठाचे उपक्रेंद वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात व्हावे अशी मागणीही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या सर्व गोष्टींवर दोन आठवड्याच्या आत निर्णय घ्या अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीव्र लढा उभारणार असा इशारा संग्राम कोते पाटील यांनी दिला.
 
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने अनेक मोर्चे घेतले आहे. यापुढेही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थांच्या न्याय-हक्कासाठी तीव्र लढा देणार असे संग्राम कोते पाटील म्हणाले.

फोटो: सोशल मीडिया