गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (11:33 IST)

संजय राऊत : 'आमदार-खासदार गेले, तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच'

sanjay raut
"मुंबई महाराष्ट्रापासून भाजपला तोडायचीय. मुंबईवरची शिवसेनेची ताकद त्यांना नष्ट करायचीय. त्यासाठी तुम्ही (शिंदे गट) तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली दिलीय. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवून आणण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री केलंय," असं संजय राऊत म्हणाले.
 
"शिवसेनेच्या खासदारांच्या बैठक झाली. मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्याच वेळेला भाजपच्या एका शाखेनं (ईडी) बोलावलं होतं. मी नव्हतो, पण माझ्याकडे माहिती आली. खासदारांच्या भावनांवर चर्चा झाली. चर्चा होते, पण याचा अर्थ खासदार गेले असे होत नाही," असंही राऊत म्हणाले.
 
आमदार-खासदार गेले, तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
 
देवेंद्र फडणवीसांवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "कुणाला आनंद होईल का? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना, दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं जातं आणि तेही जे मुख्यमंत्री झालेत, ते त्यांच्या मंत्रिमंडळात ज्युनियर मंत्री होते. पण भाजपमध्ये शिष्ट आणि आदेश यांचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागलं. त्यांचं कौतुक त्यासाठी,"
 
शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं म्हणणार नाही - संजय राऊत
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी मिळून सरकार पुढे न्यावं. भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेनेतून फुटलेल्या गटाचं राज्य आलेलं आहे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना असं आम्ही मानतो. असं विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
 
ते म्हणे, "एकनाथ शिंदेंच्या रुपाने या ना त्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिलं आहे. जर शिवसैनिकांचा मान ठेवायचा होता तर मग नारायण राणेंना का पद दिलं नाही? त्यामुळे शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणणार नाही."
 
पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आपल्याला आनंद आहे असं संजय राऊत म्हणाले.
 
या सरकारच्या कामकाजात राजकारण करणार नाही असं संजय राऊत म्हणाले.
 
काल जे उपमुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलंय ते अडीच वर्षांपूर्वी स्वीकारलं असतं तर एवढं झालंच नसतं असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.
 
संजय राऊतांबद्दल दीपक केसरकर काय म्हणाले होते?
 
एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटात सहभागी असलेले सिंधुदुर्गातील आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांच्या भाषेमुळेच शिवसेनेला सत्ता गमवायची स्थिती निर्माण झाली, असं केसरकर म्हणाले.
 
दीपक केसरकरांची मुलाखत बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित आणि आसाममधून वृत्तांकन करत असलेले बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी घेतली.
 
प्रश्न - एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुजरातमध्ये भेट झाली का?
 
दीपक केसरकर - आम्ही एक पथ्य पाळायचं ठरवलंय की, एकनाथ शिंदेंना आम्ही सर्वाधिकार दिलेत. त्यामुळे ते कुठे जातात, कुणाशी बोलतात, हे त्यांना विचारायचं नाही. त्यामुळे भेट झाली असेल तरी सांगितलंच आहे.
 
प्रश्न - म्हणजे अशी भेट झाल्याचं तुम्ही नाकारत नाही...
 
दीपक केसरकर - मी का फेटाळू? पण त्यांना विचारायचं नाही, असं आम्ही ठरवलंय, तर ते मला पाळावं लागेल ना.
 
प्रश्न - पण तुमचे ते नेते आहेत, मग तुम्हाला सांगत असतील ना?
 
दीपक केसरकर - ते (एकनाथ शिंदे) जो राजकीय निर्णय घेतात, त्या मी हस्तक्षेप करत नाही. पण आता आमदार अपात्र ठरवण्याचा खेळ चाललाय, तो अक्षरश: खेळ आहे. याला कायद्याचा कुठलाही अधिकार नाही. एखाद्या बैठकीत सहभागी झालो नाही, म्हणून अपात्र कसे ठरू? दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, तर अपात्र ठरू.
 
आमचा दोन-तृतीयांशचा गट असताना वेगळ्या गटाला मान्यता देत नाहीत. ते प्रलंबित ठेवतात. असं कुठे घडलंय का?
 
प्रश्न - तुम्ही शिंदे-फडणवीस भेटीला दुजोरा देत नाहीत, पण भाजपसोबत चर्चा तर झाली असेल ना? कारण सुरतमध्ये संजय कुटे हॉटेलमध्ये आले होते.
 
दीपक केसरकर - संजय कुटेंना मी चांगलं ओळखतो. ते काही काळ माझे सहकारी होते. मी त्यांच्या राजकारणाचा एक शब्द बोललो असेन, तर त्यांनी सांगावं. ज्यावेळेला तुम्ही बाहेर येता आणि तुमचे सोबतचे लोक आक्रमक आहेत, त्यावेळेला आपले जुने मित्र कळवतंच ना. ही नॉर्मल प्रोसेस आहे. तो निर्णय होऊ शकत नाही. आणि निर्णय घेण्याची आम्हाला पूर्ण मुभा आहे. आम्ही तर उघडपणे सांगतोय की, भाजपसोबत चला.
 
प्रश्न - भाजपसोबत चर्चा सुरू असल्याचे उघडपणे का मान्य करत नाही?
 
दीपक केसरकर - त्यांना (एकनाथ शिंदे) पूर्ण अधिकार दिलाय. ते भाजपसोबत बोलू शकतात. ते आपल्या स्वत:च्या पक्षाशी बोलून काही करायचं असेल तर करू शकतात. पण तो जो काही निर्णय घेतील, आम्ही त्यासोबत आहोत.
 
प्रश्न - भाजपचे लोक तिथं मदत करताना दिसतायेत. तुम्ही पण भाजपसोबत जायचं म्हणताय. भाजपशासित राज्यात फिरताय. भाजपसोबत जाणार हे उघड आहे. मग ताकाला जाऊन भांडं का लपवताय? तुम्ही मान्य का करत नाही की, तुमची भाजपसोबत चर्चा सुरू आहे?
 
दीपक केसरकर - चर्चा करणं म्हणजे प्रवेश करणं नाही. आज जर उद्धवसाहेबांनी ठरवलं की, शिवसेना आणि भाजपनं एकत्र यायचंय. प्रश्नच संपतो ना. महाराष्ट्रानं सेना-भाजपला मतदान केलंय. आता जे काही लोक बोलले, आदित्यसाहेबांबद्दल किंवा मातोश्रीबद्दल असेल, ते महाराष्ट्रात कधीही घडलं नाही. त्यांचं मन दुखावलं गेलं.
 
पण त्याचा विचार भाजपच्या कार्यालयानं करावा आणि आपण आपला विचारधारेचा पक्ष आहे, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय उद्धवसाहेबांनी घ्यावा. कारण ते सर्वोच्च नेते आहेत. बाळासाहेबांचं नाव महाराष्ट्राच्या हितासाठी वापरलं गेलं पाहिजे, संघर्ष करण्यासाठी नाही.
 
प्रश्न - उद्धव ठाकरे आदरणीय आहेत, पण त्यांनी मुख्यमंत्रिपदी राहू नये, असं तुम्हाला वाटतं का? कारण भाजपसोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद राहणार नाही. कारण भाजपची मागणी फडणवीस मुख्यमंत्री होण्याची आहे.
 
दीपक केसरकर - असं आपण का म्हणता? मुळात भाजप-शिवसेनेत वाद झाला, तो कशावरून झाला? अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून झाला. आज शिवसेनेचे मुख्यमंत्री अडीच वर्षे बसले. सेना-भाजपचं सरकार आलं असतं, तरी अडीच वर्षांनी साहेबांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं असतं. शेवटी याला परंपरा बाळासाहेबांची आहे की, ते जो शब्द द्यायचे ते पाळायचे. इथं पाच वर्षे बसणार असं उद्धवसाहेब कधीही बोलले नव्हते.
 
बाळासाहेबांचं स्वप्न होतं की, शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवा. त्यांना शिवसैनिकालाच बसवायचं होतं. परंतु, पवारसाहेबांनी आग्रह केला, म्हणून शिवसैनिकाऐवजी ते स्वत: बसले.
 
प्रश्न - उद्धव ठाकरेंचे अडीच वर्षे झालेत, मग उरलेले अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस असावेत असं तुम्हाला वाटतं का?
 
दीपक केसरकर - शिवसेना-भाजप एकत्र आल्यास मुख्यमंत्री कोण असावेत हे त्यांचा पक्ष ठरवेल, मोदीसाहेब ठरवेल. महाराष्ट्रातील जनतेनं सेना-भाजप युतीलाच मतदान केलंय. पवारसाहेबांनी तीन-चारवेळा शिवसेना स्प्लिट केलीय. शिवसेना फोडण्यात पवार मुख्य कॅरेक्टर होते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता, शिवसेना जेवढ्या वेळेला फुटलीय, ती राष्ट्रवादीकडून किंवा त्यावेळच्या काँग्रेसकडून फुटलीय.
 
प्रश्न - संजय राऊत म्हणाले, 'कब तक रहोगे गुवाहाटी में, कभी तो आओगे चौपाटी में...' तर या आव्हानाकडे कसं पाहताय?
 
दीपक केसरकर - संजय राऊतसाहेब जे बोलतात, ते बोलताना त्यामागे लोकांना आवडेल अशी भाषा असते. लोकांना भडक भाषा आवडते. पण वस्तुस्थिती अशी आहे की, लोकशाहीचं मंदिर असतं आणि त्याचं नाव विधानभवन आहे. त्या विधानभवनात ठरतं की कोण मुख्यमंत्री होणार आणि कोण महाराष्ट्रावर राज्य करणार. त्यामुळे चौपाटीची भाषा त्यांनी करू नये. कारण ही भाषा बोलत राहिल्यानं शिवसेनेला सत्ता गमवायची परिस्थिती निर्माण झाली. त्याला काहीप्रमाणात ही भडक भाषाही कारणीभूत असते. बाळासाहेबांच्या नेतृत्त्वात 40-50 वर्षे कामं केली, त्या लोकांनाही तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलताय, ज्यांच्या जीवावर तुम्ही राज्यसभेचे सदस्य आहात, त्यांच्याबद्दल असं बोलणार?