शरद पवार याचं कोणतंही विधान निरर्थक नसतं : संजय राऊत
‘शरद पवारांना ओळखणं कठीण आहे. पण त्यांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं. ते भारतीय राजकारणातले ज्येष्ठ नेते आहेत. पण पार्थ पवार यांच्या वक्तव्यावर त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने मत व्यक्त केलं आहे. त्यावर मी काहीही बोलू शकणार नाही. हा त्यांच्या कुटुंबातला, घरातला अंतर्गत मुद्दा आहे’, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका व्यक्त केली आहे.
तसेच, ‘अजित पवार नाराज नाहीत, माध्यमांमध्ये सांगितली जाणारी माहिती चुकीची आहे. शरद पवारांसाठी आता तो मुद्दा संपलेला आहे. माध्यमांनी पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलाय. त्यांनी सीबीआयला आमंत्रण दिलेलं नाही. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतर जर वाटलं की त्यात काही राहिलं आहे, तर जगात कुणालाही त्याचा तपास करू द्या’, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्या भूमिकेवर मत व्यक्त करताना ‘पार्थच्या मताला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. तो अपरिपक्व आहे’, असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला.