शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 मार्च 2022 (21:18 IST)

संजय राऊत यांना मुख्यमंत्री पद हवे आहे : नारायण राणे

शिवसेना नेते खासदार संजय राऊत पक्षाच्या हितासाठी काम करत नसून त्यांना मुख्यमंत्री पद हवे आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने त्यांना या संदर्भात शब्द दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने ते मुख्यमंत्री होतील त्यासाठीच, त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. आयटी हब बैठकीसाठी ते आले होते. 
 
शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे भाजपाशी संबंधित नेत्यांची ईडीकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं, यासंदर्भात बोलताना राणे यांनी संजय राऊतांनी तशी तक्रार जरूर करावी. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची नावे देखील माझ्याकडे आहेत, ती सुद्धा लवकरच इडीकडे देण्यात येणार आहेत. राऊत यांच्यापेक्षा शिवसेनेच्या नेत्यांचे उद्योग मला अधिक माहीत आहेत, असेही राणे म्हणाले. भुजबळांना अडीच वर्षे तुरुंगात राहावे लागले, असेच शिवसेनेच्या नेत्यांचेही आहे. अनेकांची कागदं माझ्याकडे तयार आहेत. फक्त एफआयआर दाखल करायचा अन् अटक करायचं एवढंच काम बाकी आहे, असा इशाराही राणेंनी दिला.
 
यावेळी राणे म्हणाले की, तुम्ही आमच्यावर टीका काय करता, टोमणे काय मारता. राज्यातील बेरोजगारी कशी संपेल याबद्दल बोला. मराठी तरुण आज उध्वस्त होतोय. इथली मुले वसई विरारच्या पुढे गेले, तिथे मोठ्या इमारती झाल्या. तिथे यांची पार्टनरशीप आहे. पवारांच्या मेहेरबानीमुळे हे आज या खुर्चीत आहेत. तुमचे अनेक नेते तुरुंगात जाण्यासाठी वेटिंगवर आहेत, अशी टीका राणेंनी केली.
 
राणे पुढे म्हणाले की, आधी एकत्र लढले आणि नंतर स्वार्थासाठी पळ काढला. जे पळून बाहेर पडले, ते आता पंतप्रधान मोदींवर बोलत आहेत. तुम्ही हिमालयाची उंची असलेल्या पंतप्रधानांवर टीका करत आहात, तुमची लायकी नाही त्यांच्यावर टीका करण्याची. कोकणात यांना एन्रॉन नको आहे, पण सगळे कॉन्ट्रॅक्टची कामे शिवसेनेच्या लोकांनी घेतली. आम्हाला विरोध केला, जमिनी शिवसैनिकांनी घेतल्या, याला शिवसेना म्हणतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 
 
मुख्यमंत्री घरी, महाराष्ट्र आजारी 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे युक्रेन येथून आलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर येणे अपेक्षित होते, पण ते आले नाहीत. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री मंत्रालयात आणि कॅबिनेटच्या बैठकीत जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आजारी पडला आहे, अशी टीका त्यांनी केली.
 
दिशा सालियन गेल्या अडीच वर्षांपासून रॉय नावाच्या एका मुलासोबत राहात होती. त्या मुलासोबत गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात दिशाचं लग्न होणार होतं. ती आई-वडिलांसोबत राहात नव्हती, आई वडिलांसोबत तिचं पटत नव्हतं. विशेष म्हणजे तिच्या आई-वडिलांना शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर घेऊन जातात, यावरुन शिवसेनेत घबराट असल्याचं दिसून येतं. दिशा सालियनवरुन सुशांतची केस उघडी झाली. याप्रकरणी लवकरच शिवसेनेचे बडे नेते जे आज मंत्री आहेत, ते आतमध्ये जातील, असे नारायण राणे यांनी म्हटले.  तसेच, तिच्या आई-वडिलांनी आमची बाजू घ्यायला हवी होती, कारण आम्ही तिच्यासाठी न्याय मागतोय, असेही राणेंनी म्हटले. शिवसेनेला वाटतं अशा केसेस करुन राणेंना त्रास होईल, पण नारायण राणे एखादं प्रकरण हाती घेतल्यास तडीला गेल्याशिवाय राहत नाही. माझ्याकडे शिवसेनेचा चोपडा असून वेळ आल्यास मी तोही ओपन करेल, असा इशाराही त्यांनी शिवसेना नेत्यांना दिला.