गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2024 (09:51 IST)

सागर बंगल्यावर बैठकांचे सत्र

devendra fadnavis
महायुतीत भाजपसोबत शिवसेना, राष्ट्रवादीचा समावेश झाल्याने उमेदवारीवरून अनेक मतदारसंघांत पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे जागावाटपाचा पेच सुटता सुटेना, अशी स्थिती झाली आहे. त्यातच ब-याच मतदारसंघांतून महायुतीतील बरेच नेते, पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुरघोड्यांचे राजकारण अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांना आज सागर बंगल्यावर बोलावले. त्यामुळे आज सागर बंगल्यावर ब-याच नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे राजकीय नेत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.
 
नगर लोकसभा मतदारसंघात पुन्हा राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखेंना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. अगोदरच आमदार राम शिंदे विखेंना विरोध करीत आहेत. त्यातच अनेक भाजप नेत्यांनी खा. विखेंना विरोध केला आहे. त्यामुळे नगरमध्ये विखेंसमोर मोठे आव्हान असणार आहे. तीच स्थिती माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळते. माढ्यातही विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घराण्याने या उमेदवारीला विरोध केला.
 
त्यातच राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांचा तर आधीपासूनच विरोध आहे. त्यामुळे महायुतीतील नाराज नेते नाईक निंबाळकर यांना विरोध करीत आहेत. याशिवाय राज्यातील ब-याच मतदारसंघांत अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या नेत्यांनी आज थेट सागर बंगला गाठून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. सर्वांच्या तक्रारी ऐकून घेऊन फडणवीस यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यातून कितपत मनपरिवर्तन होतेय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor