गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2024 (09:22 IST)

नाशिक : शेततळ्यात बुडून दोघा सख्या भावांचा मृत्यू

खामखेडा येथील बुटेश्वर शिवारात डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. 
 
याबाबत अधिक माहिती अशी की, खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर व मानव आहेर हे आई-वडिलांना मदतीसाठी शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास जंगलातून शेतात आलेल्या वानरांना हुसकावण्यासाठी ते त्यांच्या पाठीमागे गेले होते. 
 
वानरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात ते पाणी पाहण्यासाठी गेले. यावेळी मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानव याने हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला. 
 
त्यांच्यासोबत असलेल्या चार वर्षीय बहिणीने शेतात पळत येत काकांना याबाबत माहिती सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 

Edited By -Ratnadeep Ranshoor