गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2024 (09:19 IST)

नाशिकच्या तापमानात झपाट्याने वाढ, तापाचे रुग्ण वाढले

नाशिक शहरात तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने तापाच्या रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अडीच महिन्यांत तीन हजार ५२९ तापाचे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आढळल्याने रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू केले जाणार आहेत. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाच्या झळाही तीव्रपणे जाणवतील, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. 
 
उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तापमानाने सरासरी ओलांडल्याचे शहरी भागात दिसून येत आहे. सर्दी व खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने थंड पाणी पिण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
 
मागील अडीच महिन्यांत ताप सदृश आजाराच्या ३५२९ रुग्णांची नोंद महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय विभागाने रुग्णालयांमध्ये उष्पाघात कक्ष तयार केला जात आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.
 
दुसरीकडे  यंदा दुष्काळाचे सावट असल्याने प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्मघाताची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाचा पार वाढत असल्याने उष्माघात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सरसावला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ११२ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे. 
 
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गंभीर आहे. यातच, मार्च महिन्याच्या मध्यावर्तीपासूनच उष्णतेची लाट वाढत आहे. आताच जिल्ह्याचा पारा हा ३५ अंशांपर्यंत पोचला आहे. एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. याकरिता फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे उष्माघात प्रतिबंधात्मक उपायांवर प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केला आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor