शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2023 (20:34 IST)

अजित पवार गटाच्या शेजारीच शरद पवार गटाने उभारलं नवं ‘राष्ट्रवादी भवन’

ajit panwar sharad panwar
नाशिक : एकीकडे महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर असून काका पुतण्यामध्ये अद्यापही काही सुरु आहे का? अशी चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी दुफळी निर्माण झालीच आहे. नाशिकमध्ये तर या दुफळीचा जोरदार राडा देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी चांगलीच चर्चेत आली होती. दरम्यान अशातच आता नाशिकमध्ये शरद पवार गटाने एका रात्रीत शरद पवार गटाचे दुसरे कार्यालय उभारले आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे.
 
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटात राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेण्यावरून नाशिकमध्ये मोठा ‘राडा’ निर्माण झाला होता. अजित पवार आणि छगन भुजबळ समर्थकांनी राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेत शरद पवार गटाला कार्यालयात प्रवेश नाकारल्याने शरद पवार गटाच्या कार्यालयाचे काय होणार? असा प्रश्न नाशिककरांना पडला असतांना मुंबई नाका येथेच या गटाने एका रात्रीत शरद पवार गटाचे दुसरे कार्यालय उभारले आहे. शरद पवार समर्थकांनी आता पक्षाचे अधिकृत असलेले तीन मजले हायटेक कार्यालय मिळत नसल्याचे बघून 100 मीटर अंतरावर असलेल्या एका भूखंडावर तंबू ठोकत नवीन कार्यालयाचा डेरा उभारला आहे.
 
राष्ट्रवादीतील अजित पवार गटाने सरकारमध्ये सामील होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर महाराष्ट्रासह नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीवरून जोरदार कलगीतुरा रंगला. त्यातच शरद पवार येवला सभा दौऱ्यावर असताना नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयावरून राडा झाला. त्यानंतर मुंबईनाका परिसरामध्ये असलेल्या कार्यालयाचा ताबा अजित पवार गटाकडे गेला. दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता.
 
यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने अनर्थ टळला तर कार्यकर्त्यांना शांत करण्यास पोलिसांना यश आले. दरम्यान, भुजबळ गटाने राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेतल्यापासून या कार्यालयात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना एन्ट्री नसल्याने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका खासगी ठिकाणीच होत होत्या. आता शरद पवार गटाने आगामी निवडणुका लक्षात घेत पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी नवीन कार्यालयाचा तंबू ठोकला आहे.