1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (21:29 IST)

शरद पवार यांना भाजपकडून दोन मोठ्या पदांच्या ऑफर्स ; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा गौप्यस्फोट…

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक बातमी आहे. एनडीएमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार यांना भाजपनं दोन मोठ्या ऑफर दिल्या आहेत, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
 
दरम्यान अजित पवार यांना वळवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतरही भारतीय जनता पक्ष नवी समीकरणं जुळवण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांना फोडण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत. शरद पवार व अजित पवार यांची रविवारी झालेली भेट याचाच भाग होता, असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. शरद पवार यांना दोन मोठी पदं देण्यास भाजप तयार आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
 
अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फुट पडली. त्यामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर शरद पवारही भाजपसोबत जातील असं अनेकांना वाटलं होतं. पण शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. अजित पवारांच्या भुमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता भाजपने पुन्हा शरद पवारांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
 
तर अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीनंतर पुन्हा शरद पवार अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा रंगली. मात्र पुन्हा एकदा मी माझ्या निर्णयावर ठाम आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आता भाजपने शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिली आहे.
 
अजित पवारांच्या माध्यमातून या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या शरद पवार यांच्यासोबत ज्या भेटीगाठी वाढल्या आहेत, त्यामागे या ऑफर्सवरील चर्चा असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केला आहे.
 
भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor