1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जून 2023 (22:52 IST)

शरद पवारांची गुगली खरंच कोणासाठी? देवेंद्र फडणवीस की अजित पवार

ajit panwar
नीलेश धोत्रे
Devendra Fadnavis or Ajit Pawar महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पहाटेच्या शपथविधीची चर्चा पुन्हा एका रंगतेय. राजकीय गुगलीवरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.
 
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना गुगली टाकल्याचा दावा केला आहे, तर देवेंद्र फडणवीसांनी तो दावा खोडून काढत त्यांनीच पवारांना गुगली टाकल्याचा दावा केला आहे.
 
पवारांनी अजूनपर्यंत अर्धसत्यच सांगितलं आहे. मी त्यांच्याकडून पूर्ण सत्य काढून घेईल, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
 
खरंतर या पहाटेच्या शपथविधीच्या क्रिकेटमधले खरे खेळाडू तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. पण, आता समोर येतंय की या संघाला कोचिंगचं काम शरद पवार करत होते.
 
आता नेमकं या प्रकरणात आतल्या गोटात किती मॅच फिक्स झाली होती हे हळूहळू पुढे येतंय. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस केवळ त्यांचीच बाजू मांडत आहेत.
 
पण मॅचमधले उपकर्णधार अजित पवार मात्र यावर काहीही बोलायला तयार नाहीत. नाही म्हणायला त्यांनी ‘पहाटेचा शपथविधी’ या संज्ञेवरून माध्यमांना सुनावलंय हे खरंय. पण मॅचचं कोचिंग आणि फिक्सिंग कसं आणि काय काय झालं होतं ते मात्र ते सांगायला तयार नाहीत.
 
पुण्यात गरुवारी (29 जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूया.
 
“माझे सासरे होते, सदू शिंदे. ते देशातील उत्कृष्ट गुगली बॉलर होते. त्यांनी देशातील मोठमोठ्या खेळाडूंच्या विकेट घेतल्या होत्या. मी देखील जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे मी क्रिकेट खेळलो नसलो तरी मला गुगली कसा आणि कुठे टाकायचा, हे चांगलं माहिती आहे.
 
समोरचा विकेट देत असेल तर ती घेतलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे त्यांची विकेट गेली, हे सांगतच नाहीत. पण पहाटेच्या शपथविधीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे सत्तेसाठी काय करु शकतात, कोणत्या थराला जाऊ शकतात हे दिसून आलं.”
 
पवार यांनी हे सांगण्याच्या आधी याच पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराने सतत अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला.
 
तिने तीनदा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी पवारांनी, “काही बोलू नका, आता गप्प बसा…” असं म्हणून तिचा प्रश्न टाळला.
 
शेवटी तिने प्रश्न विचारलाच – “अजित पवारांना यामुळे नामुष्की पत्करावी लागली...” हा प्रश्न पूर्ण होण्याआधीच पवारांनी त्या महिला पत्रकाराला उत्तर देत म्हटलं – “असं तुमचं मत असेल.”
 
पुढे आणखी एका पत्रकारांने “दादा हिट विकेट होते का,” असा सवाल केला तो टाळत पवारांनी पुन्हा एकदा फडणवीसांच्या मुद्द्याला हात घातला.
 
पुन्हा त्याच महिला पत्रकारानं अजित पवार यांच्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला – तेव्हा हा प्रश्न त्यांना (विरोधक) विचारा असं म्हणून तो टोलवून लावला.
 
या संपूर्ण पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवारांबाबतच्या एकाही प्रश्नाला उत्तर देणं टाळलं किंवा तो प्रश्न त्यांनी टोलवला.
 
पण शरद पवार यांची ही गुगली खरंच फक्त देवेंद्र फडणवीसांसाठी होती की ती अजित पवारांसाठीसुद्धा होती? की ती फडणवीसांचा चेंडू करून अजित पवारांसाठी होती?
 
त्याचं कारणही तसंच आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांचं पक्ष संघटनेतलं महत्त्व कमीकमी होताना दिसत आहे. त्याचवेळी सुप्रिया सुळे याचं पक्षातलं महत्त्व मात्र वाढताना दिसत आहे.
 
त्याची सुरुवात खरंतर 2014 ला राज्यातली सत्ता गेल्यानंतर झाली होती.
ajit panwar supriya sule
2016-17 दरम्यान झालेल्या जिल्हापरिषदा आणि महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या सोशल मीडियावरून जेवढी सुप्रिया सुळेंना प्रसिद्धी देण्यात आली तेवढी क्वचितच अजित पवार यांना देण्यात आली. परिणामी अजित पवार यांच्या जवळच्या लोकांनी एक दुसरी एजन्सी गाठून त्यांची भाषणं लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
 
2014 ते 2023 दरम्यान अजित पवार यांच्या नाराजीच्या आणि नॉटरिचेबलच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये आल्या. त्यांना कधीच अधिकृतपणे दुजोरा देण्यात आला नाही.
 
पण कालपरवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मात्र अजित पवार यांनी स्वतःच त्यांच्या नाराजीला वाट करून दिली.
 
शरद पवारांएवढा मोठा नेता आपल्या पक्षात असून आपली स्वबळावर सत्ता का आली नाही इथपासून आतापर्यंतच्या प्रदेशाध्यक्षांची नावं आणि त्यांचा कार्यकाळ वाचून दाखवत अजित पवार यांनी एक प्रकारे जाबही विचारला आणि स्वतःवर अन्याय होत असल्याची किनारही समोर आणली.
 
बहिण सुप्रिया सुळे यांच्या हातात पक्षात कार्याध्यक्षपद आणि महाराष्ट्राचं प्रभारीपद आल्यानंतर तर त्यांनी या कार्यक्रमात थेट त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली.
 
आता उघड आहे, अजित पवार यांच्या सारखा नेता जेव्हा पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्यांचा डोळा प्रदेशाध्यक्ष पदासारख्या मोक्याच्या पदावर असणार हे उघड आहे.
 
अजित पवार यांची ही अवस्था, अस्वस्थता की अगतिकता आहे हे तेच जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात.
 
वेळोवेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधणारे अजित पवार या आणि गुगलीच्या मुद्द्यावर मात्र बोलताना दिसत नाहीत.
 
असं नेमकं कुठलं गुपित आहे जे अजित पवार यांना लपवून ठेवायचं आहे आणि ते शरद पवार आणि फडणवीसांना बाहेर काढायचं आहे? की अजित पवारांना हे मान्य आहे की या गुगलीत त्यांची हिट विकेट घेतली गेलीय म्हणून ते शांत आहेत.
 
हाच प्रश्न मी पत्रकार आणि राजकीय लेखक जितेंद्र दीक्षित यांना विचारला. 2019 च्या सत्तासंघर्षावर 35 days हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे.
 
ते सांगतात, “पहाटेच्या शपथविधीत शरद पवार यांनी अजित पवार यांचे पंख पद्धतशीरपणे कापण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी हे करून पक्षात हा संदेश दिला की, ते सांगतील तिच राष्ट्रावादीची पूर्व दिशा असेल. त्यांना जे योग्य वाटतं तेच पक्षात हेईल.
 
लक्षात घ्या हे सर्व घडेपर्यंत पक्षात अजित पवार यांचा एक मोठा गट होता. त्याचं पक्षातलं स्थानसुद्धा मोठं होतं. पण म्हणतात ना संकटात संधी सुद्धा असते तीच संधी साधून शरद पवारांनी पक्षात अजित पवारांचं काही चालत नाही हे दाखवून दिलं.”
 
शरद पवारांच्या एकंदर स्पष्टीकरणावरून आता हे स्पष्ट होतंय की त्यांच्या समतीशिवाय अजित पवार काही निर्णय घेऊ शकत नाहीत. जे घडलं ते एकप्रकारे त्यांच्या पाठिंब्यानेच घडलं होतं हे आता सिद्ध झालंय, असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
 
शरद पवारांच्या या संदिग्ध निर्णयात अजित पवार क्लिनबोल्ड झाले एवढं मात्र नक्की, असं ते पुढे सांगतात.
 
त्यांच्या मते, “या सर्व प्रकरणात अजित पवारांची शोभा झाली. जसा 1978ला शरद पवार यांच्या राजकारणावर बट्टा लागला. तसा तो यामुळे अजित पवार यांच्या राजकारणावर यामुळे लागला आहे. त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे ते आज भाजपात जातील की उद्या याची चर्चा लोकांमध्ये सतत सुरू असते. त्यांच्या प्रतिमेचं भंजन झालं आहे.
 
पण, अजित पवार याबाबत कधीच काहीच बोलत नाहीत तो त्यांचा सभ्यपणा आहे. त्यांच्या बाजूने आतापर्यंत कधी कळतंय समजतंय अशा बातम्यासुद्धा आलेल्या नाहीत. ते काकांच्या विरोधात जाताना दिसत नाहीत.”