गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (18:49 IST)

एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेनं सरकार टिकवण्यासाठी पारित केले 6 प्रस्ताव

uddhav thackeray
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षातील वातावरण ढवळून निघालं आहे. बंड टाळून सरकार टिकवण्यासाठी डावपेचांची आखणी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीी बैठक बोलवण्यात आली होती.
 
एकनाथ शिंदे गटाला धक्का देण्यासाठी शिवसेनेकडून या बैठकीत एकूण 6 प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत. या माध्यमातून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
शिवसेनेने आज पारित केलेले 6 प्रस्ताव खालीलप्रमाणे -
 
ठराव क्रमांक 1
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख म्हणून पक्षाची धुरा स्वीकारल्यापासून शिवसैनिकांना प्रभावी नेतृत्व दिलंय. पुढील काळातही त्यांनी पक्षाला असेच मार्गदर्शन करावे.
 
शिवसेनेच्या काही आमदारांनी अलीकडे केलेल्या गद्दारीचाही कार्यकारणी तीव्र धिक्कार करून उद्धव ठाकरे यांच्या मागे संपूर्ण पक्ष संघटना भक्कमपणे उभे आहे.
 
सद्यस्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय घेण्याचे व अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात येत आहेत.
 
ठराव क्रमांक 2
शिवसेनेचीही राष्ट्रीय कार्यकारणी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बजावलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल व देशात तसेच जगभरात संपादन केलेल्या गौरवाबद्दल सार्थ अभिमान प्रकट करत आहे.
 
 
ठराव क्रमांक 3
शिवसेनेची ही राष्ट्रीय कार्यकारणी आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हापरिषद, पंचायतसमिती व ग्रामपंचायत निवडणुका जोमाने लढवून सर्वत्र शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकत येण्याचा निर्धार करीत आहे.
 
ठराव क्रमांक 4
शिवसेनेची ही राष्ट्रीय कार्यकारणी मुंबई शहर व उपनगरात झालेल्या प्रचंड सुधारणा कोस्टल रोड, मेट्रो रेल मार्ग, सुशोभीकरणाचे विविध प्रकल्प विशेषता 500 फुटांच्या सर्व घरांना दिलेली कर्जमाफी अशा लोकहिताच्या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकारचे व मुंबई महापालिकेचे आभार मानत आहे.
 
ठराव क्रमांक 5
बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांनी शिवसेनेची निर्मिती झाली आहे. शिवसेना आणि बाळासाहेब हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या विलग करता येणार नाहीत आणि ते कोणीही करू शकणार नाही म्हणून शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेना पक्षाव्यतिरिक्त कोणालाही वापरता येणार नाही.
 
ठराव क्रमांक 6
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे व राहील. हिंदुत्वाच्या विचारांशी शिवसेना प्रामाणिक होती व राहणारच. महाराष्ट्राच्या अखंडतेशी व मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेनेने कधीही प्रतारणा केली नाही व करणार नाही.
 
शिवसेनेशी बेईमानी करणारे कोणीही असो, कितीही मोठे असो त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अधिकार ही राष्ट्रीयकार्यकारिणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना देत आहे. त्यासाठी ही कार्यकारणी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे.