मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 10 सप्टेंबर 2023 (11:58 IST)

शिवाजी महाराज : वाघनखं महाराष्ट्रातून इंग्लंडला कशी गेली? ती नेणारे ग्रँट डफ कोण होते?

chhatrapati shivaji maharaj
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक नुकतीच एक घोषणा केली आणि एका नव्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली.“छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री आणि मी ब्रिटिश प्रशासनाशी सामंजस्य करार करुन त्यातील अटींची पूर्तता करुन नोव्हेंबरपर्यंत ती महाराष्ट्रात आणू”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं आहे.
 
त्यामुळे या वाघनखांचा विषय महाराष्ट्रात परत एकदा चर्चेत आला आहे. तसं पाहाता शिवाजी महाराजांची तलवार, वाघनखं, टीपू सुलतानाची तलवार, कोहिनूर हिरा, मयुर सिंहासन या गोष्टींची चर्चा अधूनमधून होत असते किंवा तशी घडवलीही जाते.
 
परंतु आता पहिल्यांदाच सरकारमध्ये असणाऱ्या तेही मंत्रिपदी असणाऱ्या व्यक्तीने त्यातील वाघनखं भारतात परत आणण्याबद्दल आणि तेही कोणत्या महिन्यात आणणार याबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे. त्यामुळेच वाघनखांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
 
युरोपातील अनेक वस्तूसंग्रहालयांमध्ये जगभरातील भरपूर वस्तुंचे संकलन आणि मांडणी केलेली दिसून येते.
 
वसाहतींच्या काळात तिकडे गेलेल्या या वस्तू आता परत मिळाव्यात यासाठी अनेक देश प्रयत्न करत असतात. त्यातील काही प्रयत्नांना यश आल्याचंही आपण वाचलं असेल.
 
भारतातही या वस्तू परत मिळाव्यात यासाठी मागणी होत असते, चर्चा होत असते.
 
वाघनखं आणि संग्रहालयातली नोंद
आता ही सध्या ही वाघनखं लंडनमध्ये व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ही वाघनखं म्युझियमने लोकांना पाहाण्यासाठी खुली केलेली आहेत.
 
भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या अनेकांनी म्युझियमला भेट दिल्यावर ती पाहिली सुद्धा आहेत.
 
म्युझियमकडे प्रत्येक वस्तूची एक नोंदही असते.
 
यामध्ये म्युझियमनं पुढील नोंद केली आहे. 'हे शस्त्र जेम्स ग्रेट डफ (1789-1858) यांच्या ताब्यात होते. ते इस्ट इंडिया कंपनीत अधिकारी होते आणि 1818 साली ते सातारा येथे रेसिडंट म्हणजेच पॉलिटिकल एजंट होते. या शस्त्राबरोबर एक खोका असून स्कॉटलंडमध्ये त्यावर काही मजकूर कोरण्यात आला आहे. ही वाघनखं शिवाजी महाराजांची असून याच्या मदतीने त्यांनी मुघलांच्या सरदाराला ठार केलं. हे शस्त्र जेम्स ग्रँट डफ ऑफ इडन यांना सातारा येथे रेसिडंट असताना मराठ्यांचा पंतप्रधान पेशवे यांनी दिलं. अशी नोंद केली आहे.'
 
या नोंदीत '1818 साली बाजीराव दुसरे यांनी बिठूरला जाण्यापूर्वी काही शस्त्रंही ब्रिटिशांकडे दिली असल्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी 160 वर्षं आधी वापरली गेलेली वाघनखं हीच असावीत हे सिद्ध करणं शक्य नाही', असंही नमूद करण्यात आलं आहे.
 
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालयाने वाघनखांना महाराष्ट्रात परत आणण्याबद्दल परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.
 
या पत्रकात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमचे संचालक टायस्ट्र्ॅम हंट यांच्याशी 3 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री यांची बैठक होणार आहे असं म्हटलं आहे. तसेच 16 नोव्हेंबर 2023 रोजी ती महाराष्ट्रात येतील असं लिहिलं आहे.
 
या पत्रकात साताऱ्याचे प्रतापसिंह महाराज यांच्यानावे कारभार करणाऱ्या ग्रँट डफला ही वाघनखं प्रतापसिंह महाराज यांनी दिली आणि त्यांचा नातू आँड्रिन डफ यांनी ती म्युझियमला दिली असं म्हटलं आहे.
 
ही वाघनखं 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून 2026 साली ती परत इंग्लंडला जातील. या काळात ती मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर इथे ठेवण्यात येतील.
 
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी एसटीटी हिस्ट्री या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत वाघनखांबद्दल माहिती दिली आहे.
 
ते या मुलाखतीमध्ये म्हणतात, “सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी एक वाघनख ग्रँट डफ यांना आणि दुसरे एलफिन्स्टन यांना दिले होते. त्यानंतरही प्रतापसिंह महाराज यांच्याकडे वाघनखं असल्याचा उल्लेख येतो. सध्या म्युझियममध्ये असलेली वाघनखं प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी वापरलेली नाहीत पण ती तशी आहेत, साताऱ्याच्या राजघराण्यातून तिकडे गेलेली आहेत.”
 
वाघनखांचा उपयोग
वाघनखं ही धातूची असतात. एका पट्टीवर पुढे चार वाघाच्या नखांप्रमाणे वळलेली धातूची अणुकुचिदार नखं बसवलेली असतात आणि दोन बाजूंना ती बोटात घालायला दोन पोकळ्या असतात. ती हातात लपवून त्याच्याद्वारे अगदी जवळ असलेल्या शत्रूला मारायला वापरली जात असत.
 
छ. शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या मदतीने अफजलखानाला मारलं होतं.
 
अफजलखानाला कसं मारलं?
10 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता.
 
शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहने अफजलखानाची निवड केली. अफझल खान हा भोसले घराण्याचाच वैरी होता. त्याने शहाजी महाराजांना अटक केले होते तर शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराज यांना कर्नाटकच्या लढाईत ठार केले होते. तोच अफझल खान शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी त्यांच्याच मुलुखात येणार होता.
 
शिवाजी महाराजांच्या मुलुखात असलेल्या प्रतापगडाच्या माचीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांनी भेट घेण्याचे ठरले.
 
दोघांसोबत प्रत्येकी दोन सेवक आणि काही अंतरावर 10 अंगरक्षक राहतील असे ठरले.
 
शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत आणि शिरस्त्राण घातले होते. त्यांच्यासोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी हे दोन अंगरक्षक होते. खानासोबत सय्यद बंडा होता. शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हरकत घेत त्याला मंडपाबाहेर जाण्यास भाग पाडले.
शिवाजी महाराज आणि अफजलखान समोरासमोर आले. शिवाजी महाराजांना अलिंगन देण्यासाठी खानाने हात पसरले आणि त्यांचे मस्तक काखेत दाबून त्यांच्यावर जमदाडाने (खंजिराने) वार केला. पण शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेली असल्यामुळे त्यांना काही झाले नाही.
 
शिवाजी महाराजांनी अत्यंत चपळाईने सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांनी आपल्या अंगरख्यात आणलेल्या छोट्या कृपाणाने आणि वाघनख्यांनी अफजल खानाला ठार मारले.
हे कसे झाले याबद्दल, ‘मराठाज् अँड दख्खनी मुसलमान्स’ या पुस्तकात आर. एम. बेंथम या इतिहासकाराने लिहिले आहे की.
 
“छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी नियोजन केल्यानंतर जिजाऊ माँसाहेबांचे आशीर्वाद घेऊन ते प्रतापगडावर आले. त्यांनी आपल्या सुती अंगरख्याखाली लोखंडी चिलखत, तसंच टोपीखाली लोखंडी शिरस्त्राण घातलं. उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यांनी छोटी कट्यार (बिचवा) लपवली. तर डाव्या हाताच्या बोटांच्या मधल्या भागात ‘वाघनख्या’ हे छोटं शस्त्र बेमालूमपणे दडवून ठेवलं.
 
"भेटीसाठी जात असताना आपण घाबरलो आहोत, हे भासवण्यासाठी शिवाजी महाराज वारंवार काही ना काही कारणे दाखवून थांबत होते. भेटीवेळी अफजलखान शिवाजी महाराजांच्या दिशेने आला. गळाभेट करण्याच्या दरम्यान अफझलखानाने शिवाजी महाराजांना आवळण्याचा प्रयत्न केला असता महाराजांनी वाघनख्यांच्या मदतीने त्याचा कोथळा बाहेर काढला.”
त्यामुळे वाघनखं या शस्त्राला महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे. त्याचप्रमाणे छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील असे प्रसंग सर्वांना अत्यंत भावनिक करणारे आहेत म्हणून त्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर महाराष्ट्रावर झालेले मुघलांचे, ब्रिटिशांचे हल्ले, किल्ल्यांची लूट, सत्तांतरं, संस्थानं खालसा होणं किंवा इतर अनेक नैसर्गिक घडामोडींत अशा अनेक वस्तूंची, कागपत्रांची वाताहत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
ग्रँट डफ
ग्रँट डफ एवढ्याच नावाने महाराष्ट्रात विशेष प्रसिद्ध असणाऱ्या या इंग्रज अधिकाऱ्याचं मूळ नाव जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ असं होतं. त्यांचा जन्म 8 जुलै 1789 रोजी स्कॉटलंडमधील बॉन्फ येथे झाला. त्यांच्या आईचे माहेरचे आडनाव डफ होते. या घराण्यातून सर्व संपत्ती त्यांच्या आईला मिळाली होती त्यामुळे जेम्स ग्रँट यांनी त्या घराण्याचे नाव घेतले आणि ते जेम्स ग्रँट डफ नावाने प्रसिद्ध झाले.
 
1805 साली ते सैन्यात भरती झाले आण् पुढच्याच वर्षी ते मुंबईत आले. त्यानंतर पुण्यात आल्यावर इंग्रज आणि मराठे यांचे संबंध अगदी शेवटच्या टप्प्यात आले होते.
 
1817 च्या खडकीच्या लढाईतही ते सहभागी झाले होते. 1818 साली मराठी राज्यच लयाला गेल्यानंतर त्यांची साताऱ्याचे पॉलिटिकल एजंट म्हणून 2000 रुपये पगार आणि 1500 रुपये भत्त्यावर नेमणूक झाली. 1822 पर्यंत ते पॉलिटिकल एजंट राहिले.
 
ते इतिहासाच्या लेखनाकडे वळण्याला आणि मराठ्यांचा इतिहास हा ग्रंथ लिहिण्याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या.
 
इतिहास अभ्यासक अ. रा. कुलकर्णी जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ या पुस्तकात लिहितात, "साताऱ्याचा राज्यशकट हाकीत असतानाच त्याने मराठ्यांच्या इतिहासास आवश्यक अशी मराठी, इंग्रजी, फार्सी इत्यादी भाषांतील साधनसामग्री मिळवली, टाचणे-टिपणे तयार केली, इतिहासाच आराखडा तयार केला. दैनंदिन राज्यकारभाराचे काम सांभाळून, रात्री रात्री जागून त्याने आपल्या संकल्पित इतिहासाचा मसुदा तयार केला आणि एलफिन्स्टन, ब्रिग्ज, व्हॅन्स केनेडी यांसारख्या तज्ज्ञांकडून तो बराचसा तपासून घेतला.त्यानी साताऱ्यात वसुलाची जी व्यवस्था तयार केली होती तिला ग्रँटसाहेबाचा दस्तूर म्हटलं जाऊ लागलं."
 
1823 ते 1826 या काळात साधनांची जमवाजमव करुन इतिहासलेखन केलं. 1826 साली लाँगमन्स कंपनीनं ते प्रसिद्ध केलं. या सर्व कामासाठी डफ यांचे 1700 पौंड खर्च झाले होते. 1823 साली त्यांना सातारा सोडलं, त्यानंतर ते भारतात कधीच परतले नाहीत. 1827 साली त्यांनी कंपनीचा राजीनामा दिला.
ग्रँट डफ यांचा सातारा आणि प्रतापसिंह महाराजांशी अत्यंत चांगला ऋणानुबंध होता. त्यांनी एकत्र राज्यकारभार केला. मराठी, साताऱ्याचं राज्य यांचा एकदम जवळून संंबंध आल्यामुळे यासर्वांबद्दलही त्यांनी लिहून ठेवले. 1848 साली सातारा खालसा करुन प्रतापसिंहाची सत्ता गेल्यावर कंपनीची चूक झाली हे त्यांनी एलफिन्स्टनला कळवलं होतं.
 
अ. रा कुलकर्णी यांनी ग्रँट डफचे काही उद्गार आपल्या पुस्तकात लिहिले आहेत. ते असे, ‘लोक मला येथे मराठा म्हणतात, मराठ्यांच्या चालिरितीचे मला जितके ज्ञान आहे, तितके इथल्या लोकांच्या (इंग्लंडच्या) नसेल.’
 
कृष्णराव रामराव चिटणीस यांन प्रतापसिंहांचं पद्यात चरित्र लिहिलं होतं. त्यात ग्रँट साहेबाचाही उल्लेख आहे. त्यात ते लिहितात
 
ग्रांटसाहेब बडो धूर, सब राजनमो महशूर
 
उसे राजा प्रताप चतुर, मिलाय लिया अपनेंमे
 
चार बरस उसके साथ, बहुत मिठी बोलत बात
 
हा मनजा नोक बहुभात, सबहि राजराज की
 
जैसा बात कहत ग्रांट, वैसा दिलमो करत साट
 
राजकारन सबही बाट, लई ध्यान आपने
 
दोन दील करके पाख, मुलुख कमाय तीस लाख
 
साहेब पास बडी साख प्रतापसिंग राज की
 
मराठ्यांचा इतिहास पुस्तकाच्या नंतर पाच सहा आवृत्त्याही निघाल्या. हिंदी, गुजरातीमध्येही ते गेले. परंतु त्यातील दोषांमुळे अनेक इतिहास अभ्यासकांनी त्यावर टीका केली.
 
नीळकंठ किर्तने, वि. का. राजवाडे, वासुदेव खरेशास्त्री, महादेव गोविंद रानडे अशा अनेकांनी त्यातील उणिवा, दोष दाखवून दिले.
 
राजवाडे लिहितात, “त्याच्या हातून मिळालेल्या कागदपत्रांचा व्हावा तसा उपयोग झाला नाही. ह्या व इतर कारणांनी ग्रँट डफच्या हातून मराठ्यांच्या इतिहासाची इमारत मराठ्यांच्या दृष्टिने जशी उठावी, तशी उठली नाही. ह्याला मुख्य कारण ग्रँट डफने स्वीकारलेली पद्धत किंवा खरे म्हटले असता पद्धतीचा अभाव होय.”
 
अशी टीका होत असली तरी या सर्वांनी डफ यांच्या ज्ञानलालसेचं कौतुक केलं आहे. इतिहास लेखनाच्या पद्धतीवर आक्षेप असले तरी या सर्वांनी त्यांच्या कष्टाची दखल घेतली आहे. वासुदेवशास्त्री खरे लिहितात, “पाहा परकीयांची ज्ञानलालसा केवढी जबरदस्त! मराठे लोक हे ग्रँट डफ साहेबांचे कोण? पण त्यांचा इतिहास छापून प्रसिद्ध करण्यासाठी इकडची जुनी दप्तरे वगैरे तर त्यांनी शोधलीच, आणि वरती त्यांच्या प्रकाशनार्थ लागेल तेवढा खर्च करण्यास देखील त्यांनी मागेपुढे पाहिले नाही!!”
 
28 सप्टेंबर 1858 रोजी त्यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं.
ग्रँट डफ यांच्या नोंदीबद्दल इतिहास अभ्यासक सत्येन वेलणकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना एक बाजू मांडली.
 
ते म्हणाले, सुरेंद्रनाथ सेन यांनी फॉरिन बायोग्राफिज ऑफ शिवाजी या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच याबद्दल त्यांचं निरीक्षण मांडलं आहे. ते या प्रस्तावनेत लिहितात, it is an axiom of historical investigation that no authority, however great is more reliable than his sources मराठीत सांगायचं झालं तर, इतिहास संशोधनातला एक महत्वाचा नियम असा आहे की इतिहासकार... मग तो कितीही मोठा असो...त्याची किंमत केवढी? तर त्याने दिलेल्या पुराव्या एवढी ! (म्हणजे पुरावा किती अस्सल आहे तेवढी). त्यामुळे ग्रँट डफने केलेल्या नोंदी या ऐकीव माहितीवरच्या आहेत. त्यावर किती विश्वास ठेवायचा हे पुराव्यांच्या मदतीनेच ठरवता येईल.
 
वेलणकर पुढे म्हणाले, “कोणतीही वस्तू एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाची आहे किंवा नाही हे ठरवण्याचे तीन साधे नियम आहेत. हे नियम पुढीलप्रमाणे
 
पहिला नियम म्हणजे ती वस्तू त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाने स्वतःच्या हयातीत स्वतःच्या हाताने एखाद्या संस्थेला किंवा संग्रहालयाला जतन करण्यासाठी दिली असली पाहिजे. ती वस्तू त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाने स्वतः दिली नसेल, तर किमान त्याला जवळून पाहिलेल्या एखाद्या माणसाने ती त्या संस्थेला अगर संग्रहालयाला जतन करण्यास दिली असली पाहिजे आणि ती वस्तू अमुक दिवशी अमुक माणसाकडून संस्थेला /संग्रहालयाला मिळाली अशी लेखी नोंद त्या संस्थेकडे असायला हवी.
दुसरा नियम म्हणजे ही वस्तू त्या संस्थेत अगर संग्रहालयात आल्या दिवसापासून ते आजतागायतच्या तारखेपर्यंत, संग्रहालयाच्या अगर संस्थेच्या नोंद वहीत /स्टॉक रजिस्टर मध्ये त्याची दरवर्षीची अखंडित नोंद पाहिजे (continuous record).
 
तिसरा नियम म्हणजे त्या वस्तूला ओळखण्याच्या काही निर्विवाद खुणा अस्तित्वात असायला हव्यात.”
 



















Published By- Priya Dixit