गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (07:31 IST)

धक्कादायक: उघड्या डीपीमुळे आठ वर्षीय बालकाचा मृत्यू.

नाशिक: विद्युत महामंडळाच्या उघड्या डीपीमुळे आठ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बजरंग वाडी येथील संताजीनगर जवळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची उघडी डीपी आहे. या डीपीला कोणत्याही प्रकारचे संरक्षण भिंत अथवा जाळी लावलेली नाही. इथे लहान मुले खेळत असतात. दरम्यान येथे लहान मुले खेळत असताना एका आठ वर्षाचा मुलाला डीपीतील विद्युत वाहकाचा शॉक लागून त्याचा अपघात झाल्याने निधन झाले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बजरंग वाडी येथे संताजी नगर जवळ असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या डीपीजवळ लहान मुले खेळत असताना एका आठ वर्षीय बालकाचा विद्युत वाहकाचा शॉक लागल्याने अपघात झाला. या मुलास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार चालू असतानाच या मुलाचे दुर्दैवाने निधन झाले. ही घटना दिनांक २६ जून २०२२ रोजी सकाळच्या सुमारास घडली. अरमान मुन्ना अन्सारी असे या आठ वर्षीय मुलाचे नाव आहे. दरम्यान जिल्हा रुग्णात उपचार सुरू असतानाच दिनांक १ जुलै रोजी या मुलाचे निधन झाले आहे. दरम्यान या मुलाचे वडील हे बिगारी काम करत असल्यामुळे, त्यांना आता कोणत्याही प्रकारचा सहारा उरलेला नाही. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या उघड्या डीपी मुळे एका आठ वर्षे मुलाचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेबाबत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजिज पठाण यांनी विद्युत महामंडळाचे अधीक्षक अभियंता, नाशिक विभाग यांना निवेदन देऊन याबद्दल जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अशाप्रकारे शहरात उघड्या डीपी असल्यामुळे असेच अपघात घडण्याची संभावना आहे. त्यामुळे शहरातील सर्व उघड्या डीपींना लोखंडी जाळीने अथवा संरक्षण भिंती माध्यमातून संरक्षित करण्याची मागणी देखील या निवेदनातून केली आहे. तसेच निधन झालेल्या मुलाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आठ दिवसात संघटनेच्या वतीने प्रचंड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.