शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (21:14 IST)

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना लसीकरणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना लसीकरणामध्ये आघाडी घेत राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे , सध्या सिंधूदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आला आहे.ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, १ हजार ऑक्सिजन बेड व ७० व्हेंटिलेटर बेड उपलब्ध केले आहेत. तर परदेशातून जिल्ह्यात आलेल्या ६५ नागरिकांपैकी २० जणांचे आलेले रिपोर्ट निगेटिव्ह आहेत इतरांनाही काही लक्षणे नसल्याने त्यांचेही ओमीक्रॉन रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतात, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी आमदार वैभव नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड आदी उपस्थित होते .कोरोना लसीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप चांगले काम सुरु असून, राज्यात लसीकरणामध्ये तिसरा क्रमांक आहे मुंबई, पुणे नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली आहे ५ लाख ५५ हजार १६८ लोकांनी पहिला डोस घेतला असून, ९२ टक्के लसीकरण झाले आहे. तर ३ लाख ७१ हजार ४४१ लोकांनी दुसरा डोस घेतला असून, ६१ टक्के लसीकरण झाले आहे.