शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (20:52 IST)

कोरोना नाशिक : इगतपुरीत आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
या आश्रमशाळेत 208 विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोव्हिड चाचणी करण्यात आली.
ही आदिवासी मुलांची आश्रमशाळा आहे आणि बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात.
इगतपुरी तालुका आरोग्यधिकारी मोहम्मद देशमुख यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं, "सहा डिसेंबर रोजी मुंढेगाव आश्रम शाळेतील शिक्षक एका विद्यार्थ्याला सर्दी तापाचा त्रास आहे म्हणून बाह्य रुग्ण कक्षात तपासणीसाठी घेऊन आले होते, त्याची तपासणी केली असता त्याला ताप होता.
"आम्ही त्या विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी केली असता तो कोरोना संक्रमित आला. आम्ही परिस्थिती बघता येथील उर्वरित 207 विद्यार्थी, 18 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि इथल्या 32 शाळांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या सेंट्रल किचनचे 123 कर्मचारी अशी सर्व 349 जणांची कोरोना चाचणी केली, त्यामध्ये 14 विद्यार्थी कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह आले."
त्यांना कोणतीही लक्षण नसून सर्व 15 संक्रमित विद्यार्थ्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या बाधित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात येणार आहेत." दरम्यान या विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसली तरी त्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाशिक जिल्हा आरोग्य सहाय्यकांनी याबाबत योग्य ती माहिती घेऊन आशा सेविकांच्या मदतीने आरोग्य यंत्रणेने तपासणी करावी असे आदेश दिले आहेत.