1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (08:09 IST)

सोलापूर एसटी विभागाने मालवाहतुकीतून कमावले एक कोटी रूपये, सोलापूर विभाग राज्यातआघाडीवर

Solapur ST department earned one crore rupees from freight
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मे 2021 दरम्यान कडक टाळेबंदी असल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाने एक कोटी नऊ लाख, 49 हजार 996 रूपयांचे उत्पन्न मिळविले असल्याची माहिती विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी पत्रकाद्वारे दिली. हे उत्पन्न इतर जिल्ह्यांपेक्षा तीनपट अधिक असल्याने राज्य परिवहन महामंडळाने सोलापूर विभागाचे कौतुक केले आहे.
 
सोलापूर विभागाने 1 एप्रिल ते 13 जुलै 2021 अखेर महाकार्गोच्या माल वाहतुकीमधून एक कोटी 93 लाख 57 हजार 289 रूपये मिळविले आहेत. यामध्ये 4648 फेऱ्यामध्ये 4 लाख 60 हजार 666 किमीचा प्रवास झाला आहे. टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक वस्तुंची वाहतूक केली असून यामध्ये अन्नधान्य, शेतमाल, इतर उद्योगांना लागणारा कच्चा माल, सिमेंट यांचा समावेश आहे.
 
टाळेबंदी काळात राज्य शासनाने परिवहन महामंडळाला माल वाहतुकीची परवानगी दिली. जून 2020 पासून सोलापूर विभागाने 30 प्रवाशी वाहनांचे रूपांतर मालवाहतूक वाहनामध्ये केले. अत्यल्प प्रतिसादामुळे चिकाटी आणि ग्राहक केंद्री धोरणामुळे मालवाहतूक लोकप्रिय झाली आहे. मालवाहतुकीमध्ये सुसूत्रीकरण आणि अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी विभागीय पातळीवर स्वतंत्र मालवाहतूक कक्ष तयार केला आहे. आगार पातळीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे.
 
सोलापूर विभागाने माल वाहतुकीमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत 5158 फेऱ्यांच्या माध्यमातून 2 कोटी 53 लाख, 41 हजार 689 रूपये आर्थिक उत्पन्न मिळविले आहे. राज्य पातळीवर विभाग अग्रेसर ठरल्याने आणि वाढता प्रतिसाद पाहून महाकार्गो असे ब्रॅडिंग करण्यात आले आहे.
 
जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, आडत व्यापारी, बाजार समित्या यांना माफक दरात महाकार्गोची सेवा उपलब्ध होत आहे. बांधापासून घरापर्यंत सेवेसाठी महाकार्गो कक्ष, विभागीय कार्यालय, बुधवार पेठ, सोलापूर-413002 किंवा 0217-2733330 यावर संपर्क करण्याचे आवाहन राठोड यांनी केले आहे.