शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 मे 2021 (07:50 IST)

बारामतीमध्ये कडक लॉकडाऊनमधून काहीशी सूट

बारामतीकरांना कडक लॉकडाऊनमधून काहीशी सूट देण्यात आली आहे. बुधवार पासून बारामतीत अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.बारामतीत दि.५ मे पासून प्रांताधिकारी यांनी कडक लॉकडाऊन सुरु होता. मंगळवार (दि. १८) च्या मध्यरात्रीपर्यंत हा लॉकडाऊन सुरु होता. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी काय निर्णय घेतात, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले होते. प्रांताधिकारी कांबळे यांनी लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. परंतू राज्य शासनाचा लॉकडाऊन 31 मे च्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे. 
 
बारामतीत बुधवारपासून फळे व भाजीपाला, किराणा, गॅस वितरण, दूध वितरण, मान्सून पूर्व कामे, पाणी पुरवठ्याची कामे, कृषी व कृषी संलग्न व्यवसाय, पशुखाद्य दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु राहतील. या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने पूर्णत बंद राहणार आहेत. राज्य शासनाच्या १२ मे रोजीच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवांमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत घरपोच सेवा सुरु राहील. बारामतीत बँकांचे अंतर्गत कामकाज सुरुच राहणार असून ग्राहकांसाठी त्या १२ मे रोजीच्या आदेशानुसार बंदच राहतील.