मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मार्च 2019 (08:17 IST)

सुट्टीसाठी कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्याचे नियोजन

उन्हाळी हंगामात कोकण रेल्वेमार्गावरून पुणे आणि पनवेल येथून सावंतवाडीपर्यंत विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे-सावंतवाडी गाडी साप्ताहिक असून पनवेल-सावंतवाडी गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. या दोन्ही गाड्या ५ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावणार आहेत. पुणे-सावंतवाडी साप्ताहिक विशेष गाडी पुण्यातून सकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री आठ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. ही गाडी ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी सुटणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता सावंतवाडी-पुणे गाडी ७ एप्रिल ते ९ जून या कालावधीत दर रविवारी रात्री साडेआठ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता ती पुण्याला पोहोचेल. 
 
सावंतवाडी-पनवेल या मार्गावरची विशेष गाडी ५ एप्रिल ते ९ जून या कालावधीत दर शुक्रवार-शनिवारी रात्री साडेआठ वाजता रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता ती पनवेलला पोहोचेल. पनवेलहून दर शनिवार आणि रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता ही गाडी सावंतवाडीसाठी रवाना होईल आणि त्याच दिवशी रात्री आठ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. ही गाडी ६ एप्रिल ते ९ जून या कालावधीत धावणार आहे. आयआरसीटीसी संकेतस्थळावर या गाड्यांचे आरक्षण २३ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली.