शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (09:22 IST)

कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वेगाडी सुरू करा,अरिहंत जैन फौंडेशनची मागणी

konkan railway
कोल्हापूर-मुंबई मार्गावर सुपरफास्ट एक्स्प्रेस अथवा दुरांतो एक्स्प्रेस रूपातील रेल्वेगाडी करण्यात यावी, अशी मागणी अरिहंत जैन फौंडेशनच्या वतीने रेल्वे प्रवासी सुविधा समितीकडे गुरूवारी एका निवेदनाव्दारे करण्यात आली. फौंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल यांनी समितीच्या सदस्यांना निवेदन सादर केले. त्यामध्ये कोल्हापूरच्या पर्यटन, व्यापार, व्यवसाय विकासाच्या दृष्टीने इतरही मागण्या करण्यात आल्या आहेत.
 
समितीचे सदस्य खासदार छोटूभाई पाटील, खासदार कैलास वर्मा, श्रीमती उमादेवी गोताला यांना निवेदन सादर करून ओसवाल यांनी सविस्तर चर्चाही केली. निवेदनात केलेल्या मागण्या अशा :
 
कोल्हापूरहून मुंबईला राष्ट्रीय महामार्गावरून गेल्या पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. याच मार्गावर रेल्वेने जाण्याठी अकरा तास लागतात. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक लोक रेल्वे ऐवजी राष्ट्रीय महामार्गावरून कार, ट्रव्हलने जाणे पसंद करतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक (ट्रफिक) वाढली आहे. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई रेल्वे मार्गावर सुपरफास्ट एक्स्प्रेस अथवा दुरांतो एक्स्प्रेस सुरू करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात गुजरात, राजस्थान या राज्यातील हजारो नागरिक कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजीत नोकरी, व्यवसाय, व्यापाराच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. हे सर्व जण व्यापार, उद्योगाच्या निमित्ताने, देवदर्शनाच्या निमित्ताने गुजरात, राजस्थानमध्ये जात असतात. पण सद्यःस्थितीत गुजरात किंवा राजस्थानमध्ये जाण्यासाठी असणारी कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस आठवडय़ातून एकच दिवस शनिवारी सोडली जाते. या रेल्वेगाडीतील सर्व श्रेणीची वेटिंग लीस्ट असते. त्यामुळे ही रेल्वेगाडी आठवडय़ातून किमान तीनवेळा सोडण्यात यावी. ही रेल्वे अहमदाबादमध्ये पोहचल्यानंतर दहा ते बारा तास थांबून असते. त्यामुळे ही रेल्वे कोल्हापूर ते अहमदाबाद ऐवजी राजस्थानम्धील आबुरोड पर्यंत सुरू करणे शक्य आहे. त्या दृष्टीने कार्यवाही व्हावी. कोल्हापूर ते बेंगळूर मार्गावरील राणी चन्नमा एक्स्प्रेस सध्या कोल्हापूर ऐवजी मिरजेतून सोडली जात आहे. ती पूर्ववत कोल्हापूरमधून सोडण्यात यावी. कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील सहय़ाद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर ते सोलापूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस या रेल्वेगाडय़ा कोरोनाच्या काळात बंद करण्यात आल्या. त्या तातडीने सुरू करण्यात याव्यात.