शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (08:30 IST)

एका दिवशी दोन बालविवाह रोखले

child marriage
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्याच्या एका गावातील 15 वर्षीय बालिकेचा ता. हदगाव, जिल्हा नांदेड येथील व्यक्ती व महागाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय बालिकेचा अमरावती येथील व्यक्ती सोबत रविवार दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी विवाह नियोजित होता. याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षास गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे बालिकांच्या वयाची शहानिशा तातडीने महिला व बाल विकास विभागाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.
 
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, देवेंद्र राजूरकर यांनी तातडीने शनिवारी रात्री दिग्रस पोलीस कर्मचारी आणी संबधीत गावाचे सरपंच, पोलीस पाटील, आशासेविका व अंगणवाडी सेविका यांच्या द्वारे त्वरित घटनास्थळी भेट देऊन बालविवाह न करण्याच्या सूचना देण्यात आल्या व तसे हमीपत्र पालकाकडून घेण्यात आले तसेच नियोजित ठिकाणी जिल्हा बाल संरक्षण कक्ष -नांदेड व चाईल्ड लाईन टिम पोहचल्याने लग्नातील वऱ्हाडी यांची भंबेरी उडाली व बाल विवाह टाळला, बालिकेला बाल कल्याण समिती यवतमाळ समक्ष हजर करून कायदेशीर बाबीची पूर्तता केल्या जात आहे.
 
महागाव तालुक्यातील एका गावात सुध्दा होणाऱ्या विवाहाची लग्न पत्रिका बाळ संरक्षण कक्षाला प्राप्त झाली व उपवधू हि अल्पवयीन असल्याने तालुका प्रशासन व महिला बाल विकास विभागाचे अधिकारी हे विवाह स्थळी धडकले असता संबधितांनी आमचे लग्न नाही साखरपुडा करत आहे अशी उडवीउडवीची माहिती दिली व विवाह घडला नाही. कायदेशीर बाबीची पूर्तता करून बालिकेला बाल कल्याण समिती समक्ष हजर करण्यात येणार आहे.
 
ही कार्यवाही यवतमाळ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर तसेच तालुका संरक्षण अधिकारी प्रिती शेलोकार सामाजिक कार्यकर्ता वनिता शिरफुले यांनी केली व दिग्रस व महागावचे पोलीस, गावाचे ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थिती मध्ये ही कारवाही करण्यात आली.
 
1 जानेवारी 2022 ते 17 एप्रिल 2022 पर्यंत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने एकूण 10 बालविवाह रोखण्यात यश मिळविले असून एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 
नागरिकांनी बालविवाह बाबत सतर्क राहावे व बालविवाह बाबत माहिती असल्यास त्वरित चाइल्ड लाईन 1098 या क्रमांक वर माहिती द्यावी असे आवाहन श्रीमती ज्योती कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे विशेष म्हणजे येत्या 3 मे 2022 रोजी अक्षय तृतीया आहे व हा शुभ मुहूर्त समजल्या जातो यादिवशी अधिकाधिक विवाह होतात यामध्ये बालविवाह चे प्रमाण देखील आहे अश्या वेळी नागरिकांनी दक्ष राहावे गावात बालविवाह होत असतील तर गावचे ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना त्वरित माहिती द्यावी व बालविवाह रोखून बालकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यास मदत करावी असे आवाहन देवेंद्र राजूरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.