सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 3 एप्रिल 2021 (07:24 IST)

कडक निर्बंध लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील : मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. “मी म्हणालो होतो की परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्याला लॉकडाऊन लागू करावं लागतोय की काय, अशी शक्यता होती. ती परिस्थिती आजही कायम आहे. मधल्या काळात आपण शिथिल झालो, लग्नसमारंभ, पार्ट्या, राजकीय मोर्चे, आंदोलनं सुरू झाले. करोना गेला, अशा रितीने सगळं सुरू होतं. दुर्दैवाने जी भिती सगळे तज्ज्ञ व्यक्त करत होते, ती खरी ठरली. मार्चमध्ये गेल्या वेळेपेक्षाही आक्राळ विक्राळ रुप धारण करून करोना आलाय. हा विषाणू आपली परीक्षा बघतोय. आपल्याला धैर्याने एकत्र लढण्याची गरज आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
 
“काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते आज किंवा उद्या जाहीर होतील. कार्यालयांना याआधीच सूचना दिल्या आहेत. काही नियम आधीच लागू आहेत. सगळ्या ट्रेन तुडुंब भरून चालल्या आहेत. रोजगार परत मिळतील, पण जीव परत मिळणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. “आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील”, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. “मी अजून काही जणांशी बोलत आहे. मला वेगळा उपाय हवाय. लॉकडाऊन हा उपाय नाही. पण संसर्गाची साखळी तोडायची कशी? लसीकरण झाल्यानंतर देखील काही प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. पण या सगळ्यापेक्षा मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही नियम पाळा”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
 
“आपण काहीही लपवलेलं नाही आणि लपवणार नाही. म्हणून आपण सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर ठेवतो. दुसरीकडे काय झालं, फक्त महाराष्ट्रात कसे वाढतात? यावर मला बोलायचं नाही. मला कुणी व्हिलन ठरवलं, तरी मी माझी जबाबदारी पार पाडेन”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांनाही टोला लगावला.
 
“लॉकडाऊनचा उपयोग संसर्ग थांबवण्यासाठी आणि आपली आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे. रुग्णवाढ ही सध्या झपाट्याने होत आहे. राज्यात १७ सप्टेंबर २०२० रोजी ३ लाख सक्रिय रुग्ण होते. १ एप्रिलला त्यात भर पडली आहे. तेव्हा ३१ हजार मृत्यू होते. आता ५४ हजार ९०० च्या आसपास रुग्ण झाले आहेत. तेव्हा एका दिवशी २४ हजार रुग्ण आढळले होते. १ एप्रिलला ४३ हजारहून जास्त रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली, तर १५ ते २० दिवसांत आपल्याकडच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागतील. त्याही वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पण बेड वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयुचे बेड वाढले, तरी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी कसे वाढणार? हाच खरा चिंतेचा विषय आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. “डॉक्टर, नर्स, कर्मचारी आपल्यासारखेच माणसं आहेत. ते आजारी पडले. त्यानंतर निगेटिव्ह झाल्यानंतर पुन्हा करोना रुग्णांच्या सेवेत येत आहेत. टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपलेच बंधू-भगिनी अथकपणे काम करत आहेत. त्यांना आपण दिलासा देणार आहोत की नाही?” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.