मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2023 (21:18 IST)

लोकशाहीमध्ये अशाप्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे

devendra fadnavis
नवीन संसद भवन कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार घालत आहेत. यासंदर्भातलं एक पत्रकही विरोधकांनी जारी केलं आहे. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी यावर खरमरीत उत्तर दिलं आहे. कावीळ झाल्यासारखं वागणं बरोबर नाही असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
 
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
“लोकशाहीमध्ये अशाप्रकारचं कावीळ झाल्यासारखं वागणं हे अत्यंत अयोग्य आहे. नवीन संसद भवन हे देशाची शान आहे. जेवढ्या कमी वेळात हे तयार झालं आहे त्यामुळे देशाची ताकद दिसते आहे. जेवढ्या भव्यतेने हे संसद भवन तयार झालं आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. मात्र मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणं सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत. यापूर्वी १९७५ ला लोकसभेच्या एनएक्स इमारतीचं उद्घाटन स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी केलं होतं. मग ते लोकशाही विरोधी होतं का? यापूर्वी संसदेची जी भव्य लायब्ररी आहे त्याचं भूमिपूजन स्वर्गीय राजीव गांधींनी केलं होतं. ते लोकशाहीविरोधी होतं का? “
 
विरोधी पक्षांना पोटदुखी होते आहे
मूळात यांचा प्रश्न एवढाच आहे की वर्षानुवर्षे नवीन संसद भवन व्हायची चर्चा व्हायची ते कुणी बनवू शकलं नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते संसद भवन बनवून दाखवलं त्यामुळे कुठेतरी पोटात दुखतंय आणि तेच दिसतं आहे. विरोधी पक्षांनी जो निर्णय घेतला आहे त्यावरुन हेच दिसतं आहे की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.