गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (08:35 IST)

सुनील तटकरे राष्ट्रवादी नव्हे कुटुंबवादी; भास्कर जाधव यांची सडकून टीका

कुणबी समाजाला विधान परिषद द्या हे बोललो तर सुनील तटकरेंना मिरच्या का झोंबल्या? राष्ट्रवादीचे नाव घेऊन नेहमी कुटुंबवादी राजकारण करून सर्व पदे स्वतःच्या घरात ठेवायची आणि दुसऱ्याच्या राजकीय जीवनाची माती करायची हेच सुनील तटकरे यांचे धोरण राहिले आहे. बोगस कंपन्या काढून हजारो कोटी रुपये लुबाडायचे, गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमीन हडपायची, अशा नीतीमत्ता गमावलेल्या व उपकारांची जाण नसलेल्या सुनील तटकरे यांना मी मार्गदर्शन करूच शकत नाही, अशा शब्दात आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. अंगावर आलात तर भास्कर जाधव शांत बसणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.
 
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा कुणबी समाजाला देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी खेड तालुक्यातील पंधरागाव आंबडस येथील शिवसेना मेळाव्यानिमित्ताने केली होती. त्यांच्या या मागणीवर खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर देताना जाधवांनी कुणबी समाजाचा अपमान केला आहे. तसेच शिवसेना-राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना अशी राजकीय वारी करणाऱ्या आमदार जाधवांचे आपण मार्गदर्शन घेऊ, असे अनेक उपरोधिक टोले लगावले होते. त्यामुळे संतापलेल्या जाधवांनी पत्रकार परिषद घेत सुनील तटकरे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.