शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (17:17 IST)

काकाकडून अल्पवयीन पुतणीवर बलात्कार, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती

काका आणि पुतणी यांच्यामधील नातं वडील आणि मुलीप्रमाणेच असतं. परंतु नात्याला काळीमा फासणार्‍या एका घटनेत काकाने पुतणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 
 
बुलढाणाच्या ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या एका गावात धक्कादायक घटना समोर आली असून एका चुलत्याने आपल्या 15 महिन्यांच्या पुतणीवर वारंवार अत्याचार केला. या घृणास्पद कृत्यामुळे पीडिता पाच महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी नराधम काकाला अटक केली आहे.
 
पीडित मुलीची आई कामानिमित्ताने बाहेरगावी गेली असताना तिने आपल्या 15 वर्षीय मुलीला तिच्या चुलत काकाच्या घरी मोठ्या विश्वासाने राहण्यासाठी सुपूर्द केलं होतं. पीडिता गेल्या 11 महिन्यांपासून आपल्या काकाच्या घरी राहत होती. काका तिला वडिलांसारखा आधार देईल असं वाटत असताना काकाने मात्र विश्वासघात केला.
 
पीडिता घरात एकटी असताना काकाने तिच्यावर अत्याचार केला आणि याबाबत कुणाला सांगितलं तर जीवेमारण्याची धमकी दिली. पीडिता गेल्या 11 महिन्यांपासून आरोपी काकाचा छळ सहन करत होती. पीडितेची आई गावी परतल्यावर दीराकडून मुलीला आपल्या घरी घेऊन आली. दरम्यान तिला मुलगी नाराज असल्याचं कळून आणि काही तरी चूक घडल्याचं निदर्शनास आल्यावर तिने लेकीला विचारणा केली. तेव्हा पीडितेने आपल्यासोबत घडलेला सर्व घृणास्पद प्रकार आईला सांगितला. 
 
यावर संतापून आई लेकीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी आरोपी काकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
 
पोलीस तक्रारीनंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा अजून एक धक्कादायक अहवाल समोर आला. पीडिता पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.