1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (16:31 IST)

हे सरकार नाकर्ते सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

supriya sule
अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित महिला मेळाव्यात खा. सुप्रिया सुळे यांनी महागाईचा प्रश्न, गॅस दरवाढ, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकरी आत्महत्या, आ. राम कदम यांचे आक्षेपार्ह वक्तव्य अशा राज्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत स्थानिक महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या सभेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
रेशन कार्ड वर धान्य हे आधारकार्ड लिंक केल्याशिवाय मिळत नाही यामुळे मागील आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यात एक भुकबळी झाला. हा या सरकारचा नाकर्तेपणा आहे, असा घणाघात सुळे यांनी केला. तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
 
यावेळी बोलताना आ. वैभव पिचड यांनी सरकारवर निशाणा साधला. हे सरकार सत्तेत येण्यापूर्वी अच्छे दिन येणआर सांगत होते, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रु. जमा होतील असे सांगत होते, प्रत्यक्षात यामधील एकही गोष्ट झालेली नाही. आघाडीचे सरकार असताना २ रु. व ३ रु. प्रति किलो तांदूळ व गहू शिधावाटपात मिळत असे, या सरकारने यात बदल करुन पिवळे रेशनकार्ड असलेल्यांनाच धान्य मिळू शकेल हा कायदा सुरु केला, आमच्या काळात गॅस दर ४०० रु. असताना तो आज १००० रु. पर्यंत नेण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले, अशी टीका पिचड यांनी यावेळी केली.