"मंत्र्यांची वक्तव्यं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अशी वक्तव्यं अपेक्षित नसतात", असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांनी आक्षेपार्ह शब्द उच्चारले होते. त्यावरून तीव्र प्रतिक्रिया राज्यात उमटल्या होत्या.
या संदर्भात पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे. सुप्रिया सुळे यांनी लिहिलं, "महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात".
"परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे".
"मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया".
"याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा 'सुसंस्कृतच महाराष्ट्र' आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र" !
दरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आधी शिवी दिली आणि नंतर मी असं म्हणालोच नाही असं म्हणत घूमजाव केलं. आता त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतल्या त्यांच्या पावनखिंड या सरकारी बंगल्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडसुद्धा केली आहे. तर दीपक केसरकर यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
सत्तार यांच्या औरंगाबादमधल्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे.
"मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल अपशब्द बोललेलो नाही. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल मी बोललो. सुप्रिया सुळे आणि महिलांची मनं दुखावली जातील असं मी बोललो नाही. कोणत्याही महिला भगिनीला वाटत असेल तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो. पण मी असं काही बोललो नाही," असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणालेत.
ते पुढे म्हणाले, "त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. महिलांबद्दल मी एक शब्दही बोललो नाही. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमचे सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही उचकवण्याचा काम करू नका, आमच्यात भांडणं लावू नका. मी कोणत्याही महिला भगिनीबद्दल बोललो नाही. कुठल्याही महिलेचं मन दुखावलं गेलं असेल तर खेद व्यक्त करतो."
यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्तार यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
"सत्तेचा माज आला आहे. मीही त्यांना चॅनेलच्या माध्यमातून एकेरी आणि अपशब्द वापरू शकतो, पण ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंना उद्देशून जो शब्द वापरला त्यातून वाह्यातपणा दिसतो. अब्दुल सत्तारांना आमचा अल्टीमेटम आहे. 24 तासात त्यांनी सुप्रिया सुळेंची माफी मागावी. अन्यथा त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही," असं मिटकरी म्हणाले आहेत.
"सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना वापरलेला शब्द समस्त महिला जातीचा अपमान आहे. सत्तारांना सत्तेचा उन्माद आला आहे. ही मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सत्तार यांना समज द्यावी. अन्यथा हे अधोगतीकडे जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण तापवू नये. एखाद्या स्त्रीबद्दल, संसदरत्न पुरस्काराने सन्मानित खासदारांप्रति असे शब्द वापरता कामा नये. त्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ", असं मिटकरी पुढे म्हणाले आहेत.
Edited by - Priya Dixit