एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्या : अनिल परब
एसटी आंदोलनामुळं राज्याचे जवळपास ६०० कोटींचे नुकसान झाले आहे. शाळा, कॉलेज सुरू झाले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे. मी स्वतः अनेक कर्मचाऱ्यांना भेटत आहे. त्यांना आवाहन करतोय. समिती या बाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे संप सुरू ठवण्याला अर्थ नाही. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे, असं ते म्हणाले. अनेक कर्मचारी आता रुजू झाले आहेत.मात्र जे कर्मचारी रुजू झालेले नाहीत त्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो. एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज सोलापुरात केले.
परब म्हणाले की, राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी कामावर आलेले नाहीत. आता महामंडळानं एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे ५५ हजार संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे.
कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसे आमचे दायित्व आहे तसे राज्याच्या बाबतीत देखील आमचे दायित्व आहे. आंदोलनामुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे. इतक्या वेळी आवाहन करून देखील जर ऐकणार नसतील कारवाई शिवाय पर्याय नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांची कारवाई मागे घेण्याचा प्रश्न येतच नाही. व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्हाला कर्मचारी भरती करावी लागेल, असंही ते म्हणाले.